मोहोळ तालुक्यात घरगुती गॅसचा काळाबाजार

पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

मोहोळ : ईगल आय मीडिया

घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा मोहोळ पोलिसांनी पर्दाफाश करत १ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. शनिवार २० मार्च रोजी मोहोळ तालुक्यातील वडवळ गावच्या शिवारात पोलिसांनी हि कारवाई केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. रोहित बाळासाहेब लंबे, नितीन नागनाथ मोरे (दोघे रा. वडवळ ता. मोहोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.


याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मोहोळ तालुक्यातील वडवळ गावच्या शिवारात सोलापुर-पुणे महामार्गालगत ऑटो रिक्षा मध्ये बेकायदेशीरपणे घरगुती गॅस भरला जात असल्याची गोपनीय माहिती मोहोळ पोलिस प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार मोहोळ पोलिसांचे डीबी पथक शनिवार २० मार्च रोजी कारवाई साठी रवाना झाले होते.

सायंकाळी साडेपाच वाजता पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता, रोहित लंबे आणि नितीन मोरे हे दोघेजण ऑटो रिक्षा (क्रमांक एम.एच. २३. सी.टी. ७३५९) मध्ये भारत कंपनीचा घरगुती गॅस भरताना मिळून आले. त्यामुळे पोलिस पथकाने गराडा घालून दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी पोलिसांनी तब्बल १ लाख ७५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

या प्रकरणी वरील दोघांच्या विरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक शरद ढावरे हे करीत आहेत. घरगुती गॅसचा नवा काळाबाजार समोर आल्याने मोहोळ तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!