मोहोळ येथे गावठी पिस्तूल विक्री करणाऱ्यास पकडले

सोलापूर गुन्हे शाखेची कारवाई : आरोपीस 22 पर्यंत कोठडी

मोहोळ : ईगल आय मीडिया
देशी बनावटीचे रिवाल्वर विक्री करणाऱ्या इसमास सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून रंगेहात पकडले. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता मोहोळ – पंढरपूर मार्गावर पोखरापूर गावच्या शिवारात हॉटेल प्रतापगड येथे घडली. भारत गजेंद्र चव्हाण (रा. अमराई मळा पेनूर, ता. मोहोळ) असे त्या इसमाचे नाव आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे. मोहोळ न्यायालयाने आरोपीस २२ ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, भारत गजेंद्र चव्हाण (रा. पेनूर ता. मोहोळ) हा कब्जात देशी बनावटीचा रिव्हाल्वर काडतूससह बाळगून विक्री करणे करीता मोहोळ – पंढरपूर रोडवरील हॉटेल प्रतापगढ येथे असल्याची खात्रीशिर बातमी सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक म.इसाक म.अब्बास मुजावर, हेड. कॉ. नारायण गोलेकर, धनाजी गाडे, दिलीप राऊत, मोहन मनसावाले, पो. कॉ. अक्षय दळवी, समीर शेख यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी पोखरापूर गावच्या शिवारात हॉटेल प्रतापगड येथे सापळा लावला होता.


यावेळी भारत चव्हाण हा मोटारसायकल ( क्र. एम.एच १३ डी.सी ४८५९ ) वरुन आला असता, पोलीस पथकाने त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र तो गाडी न थांबवता पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ विनापरवाना देशी बनावटी धातूचे रिव्हाल्वर (त्यास गोलाकार पध्दतीचे ६ राउन्डचा सिलेंडर असून त्यास लाकडी मुठ, ९ इंच बरल असलेला) सह ५ जिवंत काडतूसे मिळून आली. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता, सदरचे शस्त्र बाळू लिंबा माने आणि पोपट श्रीमंत उगाडे (रा. पेनूर ता. मोहोळ) यांच्या सांगण्यावरून विक्री करण्यासाठी आणल्याचे समोर आले.


या प्रकरणी सोलापूर गुन्हे शाखेचे हेड कॉन्स्टेबल धनाजी गाडे यांच्या फिर्यादीनुसार मोहोळ पोलिसात भारत गजेंद्र चव्हाण, बाळू लिंबा माने, पोपट श्रीमंत उघाडे (सर्व रा. पेनूर ता. मोहोळ) यांच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रविवारी भारत चव्हाण यास न्यायालयात हजर केले असता मोहोळ न्यायालयाने त्याला २० ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फरार आरोपी बाळू माने आणि पोपटी उघडे यांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.


या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशुतोष चव्हाण हे करीत आहेत. या घटनेमुळे पेनूर परिसरात खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हे शाखेच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पोलीस निरीक्षक अरुण सावंत व गुन्हे शाखेच्या पथकाचे विशेष कौतुक केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!