लांबोटी शिवारात 30 हजार रुपयांची दारू जप्त

मोहोळ पोलिसांनी हॉटेल चालकास केली अटक

मोहोळ : ईगल आय मीडिया
लांबोटी ( ता. मोहोळ ) जवळ अवैध दारू विक्री प्रकरणी मोहोळ पोलिसांनी एका हॉटेल व्यवसायीकाला ताब्यात घेऊन ३० हजार रुपये रक्कमेचा दारुसाठा जप्त केला. 17 नो. रोजी दुपारी साडेबारा वाजता पोलिसांनी लांबोटी गावच्या शिवारातील भारत पेट्रोल पंपाच्या जवळ हि कारवाई केली. अनिल रामचंद्र गाडे (वय ३५ वर्षे, रा. क्रांती नगर मोहोळ) असे दारुसाठा बाळगणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, मोहोळ पोलिसांचे पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी सावळेश्वर परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलिसांना तालुक्यातील लांबोटी गावच्या शिवारात एक हॉटेल व्यवसायिक देशी विदेशी दारूचे बॉक्स घेऊन थांबला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी १७ नोव्हेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे, सहाय्यक फौजदार शेलार, पोलीस कॉन्स्टेबल महेश कटकधोंड, साठे, थोरात यांचे पथक कारवाईसाठी रवाना केले.

दुपारी साडेबारा वाजता पोलिस पथकाने लांबोटी येथील भारत पेट्रोल पंपासमोर धाड मारली असता, हॉटेल व्यवसायिक अनिल रामचंद्र गाडे हा तब्बल तीस हजार दोनशे रुपयांच्या दारू साठ्यासह आढळून आला. यावेळी पोलिसांनी त्यास ताब्यात घेत सर्व मुद्देमाल जप्त केला. त्यामुळे अनिल गाडे हा हॉटेल व्यवसायाच्या आडून बेकायदेशीर दारू विक्री करीत असल्याचे समोर आले आहे.


या प्रकरणी मोहोळ पोलिसात अनिल रामचंद्र गाडे (वय ३५ वर्षे, रा. क्रांती नगर मोहोळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे हे करीत आहेत. मोहोळ पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांची धाबे दणाणले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!