मोहोळ पोलिसांनी पकडला 6 लाखांचा गुटखा

3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल : दोघांना अटक

मोहोळ : ईगल आय मीडिया

महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेला अवैद्य गुटख्याचा टेम्पो सोलापूर गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने पाठलाग करुन पकडला. मोहोळ तालुक्यातील औंढी गावच्या शिवारात १७ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी पोलिस पथकाने सुमारे ५ लाख ९२ हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी मोहोळ पोलिसात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर भारत वरवडे, अजय संदीपान शिंदे (रा. मोडनिंब ता. माढा) व सुलतान अब्दुल शेख (रा. शेजबाभूळगांव ता. मोहोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून सुलतान अब्दुल शेख हा अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे.

या बाबत सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेला अवैद्य गुटखा कर्नाटकातून मंगळवेढा-बेगमपूर-औंढी मार्गे खाजगी वाहनाने मोहोळ तालुक्यात आणला जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार १७ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे हेड कॉ. सचिन वाकडे, पो. कॉ. सागर शिंदे, पो. कॉ. राहूल सुरवसे आणि पो. कॉ. अरब यांचे पथक मोहोळ तालुक्यातील औंढी गावात कारवाईसाठी थांबले होते. रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान वडदेगांवहून ओंढीच्या दिशेने येणाऱ्या अशोक लेलॅण्ड टेम्पो क्र. एम.एच. ४५ ए.एफ. ३७२७ ला पोलिसांनी थांबण्याचा केला. मात्र टेम्पोचालकाने टेम्पो न थांबवता वेगाने पळवायला सुरुवात केल्याने पोलिस पथकाचा संशय बळावला. यावेळी पोलिस पथकाने सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करुन अर्धा किमी अंतरावर टेम्पो आडवला. यावेळी टेम्पोतील तीनपैकी एक इसम अंधाराचा फायदा घेत पळून गेला. यावेळी पोलिसांनी उर्वरीत दोघांना ताब्यात घेतले असता, त्यांची नावे ज्ञानेश्वर भारत वरवडे, अजय संदीपान शिंदे (रा. मोडनिंब ता. माढा) आणि पळून गेलेल्या इसमाचे नाव सुलतान अब्दुल शेख असल्याचे समजले. पोलिसांनी सदर टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने विक्रीसाठी बंदी घातलेला अवैध गुटखा आढळला. यावेळी पोलिसांनी आर.एम.डी. कंपनीचा १ लाख १२ हजार आणि विमल कंपनीचा ४ लाख ८० हजार रुपये किंमतीचा गुटखा व जर्दा असा एकुण तब्बल ५ लाख ९२ हजारांच्या गुटखा व टेम्पो असा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी मोहोळ पोलिसात स्थानिक गुन्हे शाखेचे पो कॉ. सागर सूर्यभान शिंदे यांनी फिर्याद दिली असून वरील तिघांच्या विरोधात अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटख्याची सुलतानशाही जोमात सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय मोहोळ पोलिसांच्या मर्यादा देखील उघड झाल्या आहेत.


गेल्या अनेक महिन्यांपासून मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू उपसा जुगार अड्डे मटका गुटखा विक्री या सह अन्य अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत. मात्र मोहोळ पोलिस प्रशासनाला माहिती देऊन देखील कारवाई होत नसल्याने काही सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट पोलिस अधीक्षकांकडे दाद मागितली होती. त्यामुळेच पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाईचा धडाका सुरू केला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात मोहोळ पोलिसांकडून देखील अवैध धंद्यांवर जुजबी कारवाया केल्या जाऊ शकतात.

Leave a Reply

error: Content is protected !!