पती, सासू-सासरे यांच्यासह दीरावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल
मोहोळ : ईगल आय मीडिया
“बुलेट खरेदी करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये” असे म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी मोहोळ पोलिसात चौघांच्या विरोधात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. भानुदास मारुती गायकवाड नवरा, मारुती किसन गायकवाड, लक्ष्मी मारुती गायकवाड, अनिल मारुती गायकवाड (सर्व राहणार कावेरी नगर वाकड पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पीडित विवाहिता प्रियंका आणि भानुदास गायकवाड यांचे लग्न १८ डिसेंबर २०१८ रोजी मोहोळ येथील श्रीराम मंगल कार्यालयात झाले होते. लग्नानंतर पहिला एक महिना सासरच्या लोकांनी तिला व्यवस्थित नोंदविले. त्यानंतर मात्र पती भानुदास याने बुलेट खरेदी करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणून प्रियंकाला शारीरिक मानसिक त्रास देऊ लागला. त्यानंतर सासरा मारुती सासू लक्ष्मी आणि दीर अनिल हे देखील तिला पैशाची मागणी करून शिवीगाळ करणे मारहाण करणे उपाशी ठेवणे रात्री-अपरात्री घरातुन बाहेर हाकलून देणे इत्यादी प्रकार करून जाचहाट करू लागले.
या प्रकाराबाबत प्रियंकाच्या माहेरच्या लोकांनी समजावून सांगून देखील त्यांच्या वर्तनात कोणताच फरक पडला नाही. अखेर त्यांनी २८ मार्च २०१९ रोजी प्रियंकाला मारहाण करून घरातून हाकलून दिले. त्यामुळे ती माहेरी आई वडिलांकडे राहत आहे. दरम्यान कोरोना महामारीमुळे सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीत भानुदास गायकवाड याने आई वडील व भाऊ यांच्याशी संगनमत करून दुसरे लग्न केले. याबाबत त्याने १ मार्च २०२१ रोजी मोहोळ तालुक्यातील सारोळे येथे येऊन “मी दुसरे लग्न केले आहे, मला त्रास होईल असे वागू नका” असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून निघून गेला.
दरम्यान घडल्या प्रकाराबाबत प्रियंका गायकवाड हिने सोमवार ८ मार्च रोजी मोहोळ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पती, सासू-सासरे व दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल लोभू चव्हाण हे करीत आहेत. सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा होत असताना मोहोळ मोहोळ तालुक्यातील महिलेवर झालेल्या अत्याचाराची घटना समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.