वाळू तस्करी : मोहोळ पोलीसांकडून कारवाई

दोन लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

मोहोळ : ईगल आय मीडिया
सीना नदीतील अवैध वाळू तस्करी बाबत मोहोळ पोलीसानी कारवाई केली असून गुरुवार १८ मार्च रोजी वाळूचोरी करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी आष्टे गावच्या शिवारात कारवाई करुन २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. मात्र टेम्पो चालक पळून गेल्याने पोलिसांच्या हाती लागला नाही. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे.


याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मोहोळचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे पथक गुरुवार १८ मार्च रोजी वडवळ परिसरात गस्त घालत होते. सकाळी साडेसहा वाजता हे पथक आष्टे गावच्या वेशीत आले असता, लाल रंगाचा टेम्पो (क्र. एम.एच. १२ आर. ८०१२ ) हा येताना दिसला.

सदर टेम्पो चालकाची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिस नाईक शरद ढावरे यांनी टेम्पो तपासणीसाठी थांबवला. यावेळी टेम्पोचालक वाहन जागेवरच सोडून पळून गेला. त्यामुळे पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये सीना नदीतून चोरलेली दिड ब्रास वाळू मिळून आली.

यावेळी पोलिसांनी वाळू सह तब्बल २ लाख ३० हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी मोहोळ पोलिसात टेम्पो चालक आणि मालक यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक लक्ष्‍मण राठोड हे करीत आहेत.


गेल्या काही महिन्यांपासून वाळू माफियाने वाळू चोरी करून सीना नदीचे पात्र पोखरून काढले असताना पोलिसांकडून कोणतीच कारवाई होत नव्हती. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या विशेष पथकाने मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक मोठ्या कारवाई केल्यामुळे मोहोळ पोलिसांच्या मर्यादा उघड झाल्या होत्या. यामुळे मोहोळ पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली होती. त्यानंतर आता पहिल्यांदाच मोहोळ पोलिसांनी वाळू तस्करांवर कारवाईचा बडगा उगारल्याने नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!