आत्महत्या केल्याचा मोहोळ पोलिसांचा प्राथमिक अंदाज.
मोहोळ : ईगल आय मीडिया
लॉकडाऊन मध्ये बंद असलेल्या मोहोळ शहरातील एका हॉटेलच्या किचनमध्ये एका इसमाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. हा धक्कादायक प्रकार रविवार ३० ऑगस्ट रोजी उघडकीस आल्याने संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. कुलदिपसिंग सोलसिंग मरावी (रा. मध्यप्रदेश) असे मृत इसमाचे नाव असून तो याच हॉटेलात कामगार होता. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज मोहोळ पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे.
या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मोहोळ शहरातील कन्या प्रशाला चौकात सोलापूर पुणे महामार्ग लगत “रुची” नावाचे हॉटेल आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या पाच महिन्यांपासून हे हॉटेल बंद आहे. हे हॉटेल पंढरपूर येथील एका व्यवसायीकाला चालविण्यासाठी दिलेले आहे. सदर हॉटेल मध्ये तीन परप्रांतीय मजूर काम करत होते. त्यांपैकी दोन कामगार आपल्या गावी परत गेले होते. तर एक कामगार ई-पास न मिळाल्याने हॉटेलातच राहत होता.
दरम्यान, रविवार ३० ऑगस्ट रोजी या हॉटेलातून दुर्गंधी येत होती. त्यामुळे या परिसरातील नागरीकांनी ही माहीती मोहोळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हॉटेलच्या किचन मध्ये एका इसमाचा सडलेला मृतदेह फरशीवर पडलेल्या अवस्थेत आढळून आला.
सदर मृतदेहाच्या बाजूलाच असलेल्या लोखंडी अँगलला एक पडदा बांधून गळफास घेतल्याचे प्राथमिक दृष्टया समोर आले. या पडद्याला मृतदेहाच्या गळ्याचे हाड चिकलेले आढळले. तर मृतदेहाचे शीर धडापासून वेगळे झाले होते. यावेळी पोलिसांनी रितसर पंचनामा करुन तपासणी केली असता, सापडलेल्या कागदपत्रांवरुन सदरचा मृतदेह कुलदिपसिंग सोलसिंग मरावी (रा. मध्यप्रदेश) या मजूराचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी मोहोळ पोलिसांत अकस्मात मृत्यूचे नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बजरंग बाडीवाले हे करीत आहेत.