अनैतिक संबंधामुळे अलोकची पत्नी त्रस्त होती
टीम : ईगल आय मीडिया
नागपूर मध्ये पत्नी व मुलांसह पाच जणांची हत्या करणारा आलोक माथूरकर हा स्ञिलंपट स्वभावाचा होता व तो महिला वशीकरणाची विद्या शिकत होता, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्याच्या या स्त्री लंपट पणामुळे पत्नी त्रस्त होती असेही तपासातून समोर येत आहे.
नागपूर येथे 36 वर्षीय युवकाने आपल्या पत्नी, दोन मुलांसह सासू आणि मेहुनीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली आहे. या हत्याकांडामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पोलीस तपास करीत असताना धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
अलोक हा आपल्या मूळ गावातून नागपुरात राहण्यासाठी आला होता. इथं त्याचे त्याच्या मेहुणी सोबत अनैतिक संबंध जुळून आले. मात्र त्यातून घरात कलह सुरू झाला. त्यामुळे मेहुणी अमिषा बोबडे ही त्याच्यापासून दूर गेल्यानंतर त्याने तिच्या खुनाचा कट आखला असेल, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यातूनच रात्री आलोकने पत्नी विजया, मुलगी परी, मुलगा साहील, सासू लक्ष्मी बोबडे आणि मेहुणी अमिषा बोबडे यांना अतिशय क्रूरपणे संपवले. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली.
सकाळी सासरे देवीदास बोबडे घरी आले. त्यावेळी पत्नी व मुलीच्या अंगावर चादर टाकली होती. देवीदास यांना वाटले की दोघी झोपल्या असतील. सासऱ्यांनी चहा घेतला, आंघोळ केली. घरमालकाला भाडे दिले व वीज बिल भरून घरी परतले. पत्नीला उठवण्याचा प्रयत्न केला असता ती रक्तबंबाळ दिसली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना जावयावर संशय आला. त्याला शोधण्यासाठी त्याच्या घराकडे गेले असता तेथे चार मृतदेह सापडले. हे बघून पोलीसही हादरले.
घराचा पंचनामा केला असता आलोकचा मोबाईल सापडला. पोलिसांनी ते उघडून त्यातील संभाषण वाचले. तो महिला वशीकरणाची विद्या शिकण्यासाठी अनेकांच्या संपर्कात होता. अशा स्वरूपाच्या काही व्हॉट्सअॅप समूहाशी जुळला होता. तो यात महिला वशीकरणाच्या चित्रफिती बघायचा. महिलांना वश करून त्यांचा उपभोग घेण्याच्या उद्देशाने तो हे करीत होता, अशी माहिती समोर येत आहे.
या विद्येचा वापर त्याने आपल्या मेहुणी अमिषावर केल्याचे सांगितले जाते. ती त्याच्या जाळ्यात अडकली होती पण, ती इतर मित्रांच्या संपर्कात असल्याने आलोकला खटकत होते. त्यामुळे अमिषावर बंधन घालत होता. आणि त्यातूनच गृह कलह वाढल्याने त्याने हे हत्याकांड केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.