गृहमंत्र्यांच्या गावात पोलीस ठाणे झाले जुगाराचा अड्डा
टीम : ईगल आय न्यूज
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गावात म्हणजेच नागपूर मधील कळमना पोलीस चौकीत चक्क जुगार चालत असल्याचे व्हिडिओ फुटेज समोर आले आहे. पोलीस कर्मचारी टेबलवर पिस्तूल ठेऊन सिगारेटचे झुरके मारत पत्त्यांचा डाव खेळात असल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओमुळे महाराष्ट्र पोलिसांच्या प्रतिष्ठेची लक्तरे टांगली गेली आहेत.
गुन्हेगारी पटकथा असणाऱ्या कोणत्याही सिनेमातील दृश्य असल्याचा भास व्हावा असे दृश्य नागपूर येथील कळमना पोलीस चौकीतून बाहेर आले आहे.
टेबलवर पिस्तूल ठेवलेली आहे, खाकी वर्दीतील पोलीस कर्मचारी सिगारेटचे झुरके मारत पत्ते पिसत आहे, दुसरा एक कर्मचारी समोर बसून हातातील पत्ते पाहतो आहे, खाकी वर्दीतील पोलीस कर्मचारी सिगारेटचे झुरके मारत धूर सोडतो आहे आणि मधूनच डोकावून समोरच्या कर्मचाऱ्यांकडील पत्ते पाहण्याचा प्रयत्न करीत आहे.
असे हे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. कोणी तरी तक्रारदाराने हा व्हिडीओ काढला असल्याची शंका व्यक्त होत असून राज्याच्या गृहमंत्र्यांच्याच गावात चक्क पोलीस ठाण्यात पोलिसच धूम्रपान करीत जुगार खेळत असल्याचे दृश्य पाहून खळबळ उडाली आहे.