गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया 12 तासानंतर ही अपूर्ण !
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर शहरातील एका खाजगी सावकाराच्या घरावर शुक्रवारी शहर पोलिसांनी अचानक कारवाई असून यामध्ये खाजगी सावकारीशी संबंधित जमिनीची कागदपत्रे, धनादेश सापडले आहेत. या संदर्भात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या कारवाईमुळे शहर व तालुक्यातील खाजगी सावकार लॉबीत मात्र खळबळ उडाली आहे.
तो सावकार राजकीय पक्षाचा पदाधिकारी ?
शुक्रवारी शहर पोलिसांनी खाजगी सावकारावर कारवाई केली तो एका राजकीय पक्षाचा शहराध्यक्ष असल्याची चर्चा शुक्रवारी सायंकाळ पासून शहरात सुरू आहे. यावरून खाजगी सावकारांनी आपल्या बेकायदा व्यवसायासाठी राजकीय पक्षांची कवच कुंडले परिधान केल्याचे स्पष्ट होत होते.
पंढरपूर शहर पोलिसांना खाजगी सावकारी बाबत एका सावकाराच्या विरोधात तक्रार अर्ज आला होता. त्यानुसार शुक्रवारी शहर पोलिसांनी संबंधित सावकाराच्या घरी छापा मारला. सुमारे 3 तासांहून अधिक वेळ घरांत तपासणी केल्यानंतर पोलिसांना मोठ्या प्रमाणात सावकारी संदर्भात जमिनीचे सात बारा उतारे, अन्य कागदपत्रे, स्टॅम्प, कोरे धनादेश आढळून आले आहेत असे समजते. मात्र याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खाजगी सावकारी संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. मात्र सकाळपर्यंत ही माहिती मिळाली नाही. त्यामुळे अजूनही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर शहर आणि तालुक्यातील खाजगी सावकारांमध्येमोठी मात्र खळबळ उडाली आहे.