तीन महिन्यात 21 केसेस, वाळूसह 87 लाखाची वाहने जप्त
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर तालुक्यातील वाळू तस्करांविरोधात तालुका पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला असून गेल्या 3 महिन्यात वाळू आणि वाहने जप्तीची मोहीम हाती घेऊन 87 लाखांपेक्षा जास्त किंमती वाहने आणि वाळू ताब्यात घेतली आहे. शिवाय 21 केसेस ही नोंदवल्या आहेत.
सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी पदभार घेताच जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि इतर अवैध धंदे बंद करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. पंढरपूर तालुका पोलिसांनी याची तात्काळ अमलबजावणी सुरू केली असून मागील तीन महिन्यापासून पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक अवैध धंद्यावर धाडी टाकून कारवाई केली आहे.
तसेच वाळू उपसा करणारविरुद्ध तर कठोर पावले उचलून, तीन महिन्यात 21 केसेस दाखल केल्या आहेत. यामध्ये एकूण 86 हजार 500 रुपये किमतीची वाळू जप्त केली असून एकूण 86 लाख 96 हजार रुपये किंमतीची वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. मागील ऑक्टोबर महिन्यात एकूण 4 केसेस, त्यामध्ये 7आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोव्हेंबरमध्ये 6 केसेस, त्यामध्ये 4 आरोपी तर डिसेंम्बर मध्ये 11 केसेस करून 11आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाप्रकारे मागील तीन महिन्यात केवळ वाळू विरोधात कारवाई केली असून यापुढेही कोण वाळू उपसा करीत असल्याचे आढळून आल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी सांगितलं आहे.