3 महिलांची सुटका : लॉज चालकास अटक
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर सांगोला मार्गावर हॉटेल आनंद लॉज येथे पोलिसांनी छापा टाकून चालू वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 3 महिलांची सुटका केली असून लॉज चालकास अटक केली आहे. या कारवाईमुळे पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली असून तासावर जोडप्यास रूम देणाऱ्या इतर लॉज चालकांचे धाबे दणाणले आहेत.
पंढरपूर – सांगोला रोडवर हॉटेल आनंद लॉज येथे अवैध वेश्या व्यवसाय चालू असल्याचे पोलिसांना समजले होते. त्यानुसार 22 सप्टेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तालुका पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांच्या पथकाने बनावट ग्राहक, शासकीय पंचासह कारवाई केली. यावेळी लॉजमध्ये 3 महिला आढळून आल्या.
त्यांच्याकडून हॉटेल मालक लक्ष्मण वसंत चौगुले ( वय 60 वर्षे, राह.पंढरपूर ) हा आपल्या आर्थिक हेतूसाठी या महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून तिन्ही महिलांची सुटका केली आहे तर आरोपी लक्ष्मण चौगुले यांच्या विरोधात तालुका पोलिसात गुन्हा नोंदवून त्यास अटक केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मागर्दशनखाली तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मिलिंद पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.