रोपळे येथील 3 जनाविरोधात तालुका पोलिसांत तक्रार दाखल
पंढरपूर : ईगल आय मीडिया
गावच्या राखीव सरपंचपदी आपल्या गटाचा सदस्य नियुक्त व्हावा आणि तो अपात्र ठरू नये म्हणून त्याचे शासकीय जागेत असलेले अतिक्रमण कायदेशीर दाखवण्यासाठी केलेला खटाटोप माजी सरपंच आणि ग्रामपंचायतीचे 2 कर्मचारी यांच्या अंगलट आला आहे. रोपळे ( ता.पंढरपूर ) चे माजी सरपंच दिनकर कदम आणि ग्रामपंचायतीचे दोन कर्मचारी यांच्या विरोधात ग्रामसेवकाने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. आता त्या सदस्यांचे पद ही जाण्याची शक्यता असून पार्टी प्रमुख आणि दोन ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावरही कारवाईची शक्यता बळावली आहे.
याबाबत रोपळे चे ग्रामसेवक कृष्णा हरी नवले यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेली फिर्यादीनुसार, सविस्तर वृत्त असे की, रोपळे ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत तत्कालीन सरपंच दिनकर नारायण कदम यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. मात्र ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनु. जमाती महिलेसाठी राखीव झाले असून या प्रवर्गातील एकमेव सदस्य दिनकर कदम यांच्या गटाचे निवडून आले आहेत. त्यामुळे सत्ता गेल्यानंतर ही दिनकर कदम यांच्या गटाचा सरपंच होणार होता.
मात्र त्याच्या गटाच्या अनु. जमाती प्रवर्गातील सदस्य शशिकला दिलीप चव्हाण यांचे उजनी विभागाच्या शासकीय जागेवर मालमत्ता क्रम. 1579 वर अतिक्रमण आहे. या अतिक्रमण मुळे शशिकला चव्हाण सदस्य पदासाठी अपात्र ठरतील म्हणून ही जागा त्यांच्या नावे खरेदी देण्याचा घाट घातला गेला.
त्यासाठी ग्रामपंचायतीचे नमुना नंबर 8 चे रजिस्टर दिनकर चव्हाण यांनी ग्रामपंचायतीचे क्लार्क दशरथ मधुकर कदम आणि शिपाई नितीन जाधव यांच्या करवी आपल्या घरी नेले. आणि व्हाईटनर ने खाडाखोड करून ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नवले यांच्याकडून त्यांच्या हस्ताक्षरात मंगल अर्जुन भोसले यांच्या नावे भोगवटदार आणि फेरफार नोंदी करून घेतल्या आहेत.
यावेळी दिनकर कदम यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 22 फेब्रुवारी रोजी नूतन ग्रामपंचायत सदस्य नितीन कदम, हनुमंत कदम यांनी ग्रामपंचायत मध्ये जाऊन या विषयाची माहिती घेतली.
त्यानंतर ग्रामसेवक नवले यांनी दिनकर कदम यांनी आपल्या गटाचा सरपंच व्हावा आणि त्यासाठी शशिकला चव्हाण या सदयांचे शासकीय जागेतील अतिक्रमण अडथळा ठरू नये म्हणून दिनकर नारायण कदम यांनी दशरथ कदम, नितीन जाधव यांना दमदाटी करून कागदोपत्री खाडाखोड केली. आणि शशिकला चव्हाण यांचे अतिक्रमण असलेली जागा मंगल अर्जुन भोसले यांचेकडून शशिकला दिलीप चव्हाण यांनी खरेदी केली असल्याचे दाखवून बेकायदेशीर नोंद केली आहे. अशी तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. यामुळे रोपळे गावसह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
यावरून आता ग्रामपंचायतीचे सरपंच पद दिनकर कदम यांच्या गटाला मिळते की, त्यांच्यासह ग्रामपंचायत चे दोन कर्मचारी यांच्यावर कारवाई होते, तसेच सदस्यत्व रद्द होते का याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.