पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन ची वाळू चोरी विरोधी धडक मोहीम
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पोहोरगाव ( ता.पंढरपूर ) येथे अवैध वाळू चोरी करणाऱ्या 3 जनाविरोधात पंढरपूर तालुका पोलिसांनी कारवाई केली असून, गावच्या पोलीस पाटलाच्या मुलासह तिन्ही आरोपींना अटक केली आहे. शिवाय वाळू चोरीतील वाहनसह 14 लाखांचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली आहे.
पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन चे सपोनि खरात यांनी मिळालेल्या माहितीवरून त्यांच्या पथकाने पोहोरगाव, (ता.पंढरपूर) मध्ये मध्ये चालू असलेल्या वाळू चोरीवर कारवाई केली. या छाप्या मध्ये 3 महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर मॉडेल 605, त्याला प्रत्येकी एक डम्पिंग ट्रॉली, आणि सदर डम्पिंग ट्रॉली मध्ये भरलेली वाळू असा एकूण 14 लाख 18 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या वाळूचोरीबाबत आरोपी संतोष दादाराव पाटील ( वय 26 वर्ष ) नितीन धनाजी गायकवाड (वय 24 वर्ष) बालाजी शंकर गायकवाड (वय 26 वर्षे, सर्व रा.पोहरगाव, ता. पंढरपूर ) यांनी संगणमत करून सदरचा गुन्हा केल्याने सदरच्या तीन ही जणांना अटक करण्यात आली आहे.
यातील आरोपी संतोष दादाराव पाटील याचे वडील पोहोरगाव चे पोलीस पाटील आहेत, तसेच त्याचेवर वाळूचोरीचे यापूर्वी देखील दोन गुन्हे नोंद आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक चंदनशिवे हे करत आहेत.
पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या नेतृत्वाखाली सपोनि आदिनाथ खरात, सपोनि शंकर ओलेकर, पोउनि सचिन वसमळे,पोलीस शिपाई देवेंद्र सुर्यवंशी, होमगार्ड सचिन मदने, होमगार्ड सोमनाथ सूळ यांनी ही कामगिरी पार पाडली.