किरकोळ भांडण : दोघांचा खून

बापाला मारहाण केली म्हणून मित्राच्या मदतीने दोघांचे खून

टीम : ईगल आय मीडिया

विहापूर ( ता. कडेगाव, जि. सांगली ) येथे किरकोळ मारहाणीच्या कारणावरुन झालेल्या हाणामारीत संदीप भानुदास चव्हाण आणि विजय नानासाहेब माने या दोघांचा खून झाला आहे. तर गणेश सतीश कोळी आणि गोरख महादेव कावरे हे जखमी झाले आहेत. या खून प्रकरणी संशयित आरोपी मधुकर उत्तम मोरे आणि विशाल तानाजी चव्हाण यांच्याविरोधात कडेगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी मधुकर मोरे याला अटक केलीय. तर विशाल चव्हाण हा फरार आहे. ही घटना काल (29 ऑक्टोबर) शुक्रवारी रात्री उशीरा घडली. या दुहेरी खून प्रकरणाने तालुका हादरला आहे.

विहापुर येथे शनिवारी न ते चार जणांनी मिळून एका व्यक्तीला मारहाण केली. याची माहिती मारहाण झालेल्या व्यक्तीच्या मुलाला मिळताच त्याने आपल्यासोबत एका मित्राला घेत चौघांना रक्त येईपर्यंत मारलं. यापैकी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेमुळे विहापूर गावात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे विहापूर या गावाची शांतताप्रिय म्हणून ओळख आहे.

विहापूर येथील गणेश कोळी, गोरख कावरे आणि विजय माने यांनी (28 ऑक्टोबर) दुपारी चार वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरुन या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मधुकर मोरे याचे वडील उत्तम मोरे यांना मारहाण केली होती. तर गणेश, विजय आणि गोरख या तिघांनी मिळून आपल्या वडिलांना मारहाण केल्याची माहिती मधुकर मोरे याला मिळाली. त्यामुळे संतापलेल्या मधुकर याने आपला मित्र विशाल चव्हाण याला सोबत घेवून विजय माने, गणेश कोळी, गोरख कावरे यांना लाकडी दांडके, काठी आणि ऊसाने मारहाण करुन गंभीर जखमी केले.

आरोपी मधुकर एवढ्यावरच थांबला नाही. त्याने विजय, गणेश आणि गोरख या तिघांचा मित्र असलेला संदीप चव्हाण याला त्याच्या घरातून बाहेर बोलावलं. मधुकर मोरे आणि विशाल चव्हाण या दोघांनी त्याला लाकडी दांडके, काठी व ऊसाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने संदीप चव्हाण याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर विजय माने हाही गंभीर जखमी झाल्याने नातेवाईकांनी त्याला सांगली येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. पण तिथे उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.

या खून प्रकरणाची माहिती मिळताच कडेगाव पोलीस घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. तसेच पोलिसांनी या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मधुकर उत्तम मोरे याच्या मुसक्या आवळल्या. तर दुसरा संशयित आरोपी विशाल तानाजी चव्हाण याच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना केली.

Leave a Reply

error: Content is protected !!