‘तरुणी’च्या नावे फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि…!

24 तोळे सोने चोरणारा फरार आरोपी पकडला : पिंपरी चिंचवड पोलिसांची फेबुगीरी

टीम : ईगल आय मीडिया

24 तोळे सोने आणि 40 हजार रुपये घेऊन फरार झालेल्या आरोपीस सांगवी ( पिंपरी चिंचवड ) पोलिसांनी वेगळीच शक्कल लढवून मुद्देमालासह पकडले आहे. पोलिसांनी सदर आरोपीला फेसबुकवरून तरुणीच्या नावे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्याला मैत्रीच्या जाळ्यात ओढले आणि पिंपळे गुरव परिसरात भेटायला बोलावून बेड्या ठोकल्या. संदीप भगवान हांडे (रा. वाल्हेकरवाडी) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून २४ तोळे सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात संगीता अजित कांकरिया यांच्या घरातून अज्ञात व्यक्तीने २४ तोळे सोन्याचे दागिने आणि ४० हजार रुपये रक्कम लंपास केली होती. त्यानुसार सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांपूर्वी फिर्यादी संगीता कांकरिया यांच्या घरी काळजीवाहू म्हणून आरोपी संदीप हांडे हा कामाला होता. परंतु, त्याने काही दिवसातच काम सोडले होते. त्याच्यावर घरातील व्यक्तींचा संशय होता, त्यानुसार पोलिसांना याची माहिती दिली. मात्र, तो फरार होता.

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आरोपी संदीप हांडे याला तरुणीच्या नावे फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. आरोपी संदीपने रिक्वेस्ट ला प्रतिसाद दिला आणि पोलिसांनी तरुणीच्या नावे त्याच्यासोबत चॅटिंग सुरू करीत काही तासातच संदीपला विश्वासात घेत त्याला पिंपळे गुरव परिसरातील कल्पतरू या ठिकाणी भेटण्यासाठी बोलावले.

त्यावेळी पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपी संदीपला अटक केली. सखोल चौकशी केली असता कांकरिया यांच्या घरातील २४ तोळे सोन्याचे दागिने आणि ४० हजार रोख रक्कम चोरी केल्याचं कबूल केलं. सदरची कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे, गुन्हे पोलिस निरीक्षक अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव साळुंके यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!