सय्यद वरवडे : आरोपींवर स्थानबद्धतेची कारवाई करा : एड. इरफान पाटील यांची मागणी
मोहोळ : ईगल आय मीडिया
मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडेच्या सरपंचावर हल्ला करणारे गावगुंड गुन्हा दाखल होऊन देखील मोकाट फिरत आहेत. त्यांनी गावात दहशत निर्माण केली आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य एडवोकेट इरफान पाटील यांनी आरोपीं विरोधात स्थानबद्धतेतची कारवाई करण्याची मागणी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. याबाबतची तक्रार त्यांनी मोहोळ पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सय्यद वरवडे ग्रामपंचायतीची पहिली मासिक सर्वसाधारण सभा १० मार्च रोजी सरपंच वाल्मिकी निळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार होती. या मिटींगला जात असताना ग्रामपंचायत कार्यालयाच्या पोर्चमध्ये दरवाज्यात उभ्या असलेल्या गावातील गाव गुंडांनी “तू मीटिंग ला जायचे नाही” असे म्हणून सरपंच वाल्मिकी निळे यांना ओढून बेदम मारहाण केली होती. यावेळी सोडवायला आलेल्या शिवराज निळे यांनाही मारहाण करण्यात आली होती.
या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने राजेंद्र औदुंबर विरपे, अंकुश उर्फ भाऊ मारुती कदम, देविदास भिवा कदम, सोमनाथ विलास विरपे, बाळू भिवा कदम (सर्व रा. सय्यद वरवडे, ता. मोहोळ) या पाच जणांच्या विरोधात भादंवि ३४१ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १८४ नुसार पंचायतीचे सदस्य किंवा सरपंच उपसरपंच यांना लोकसेवक गणले गेले आहे. हि तरतुद दाखविल्यानंतर भादंवि ३५३ हे कलम वाढविण्यात आले होते.
गुन्हा दाखल झाल्याची माहिती होताच वरील पाचही आरोपींनी पळ काढल्याने ते अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाहीत. या आरोपींचा म्होरक्या बाळू भिवा कदम हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी अटक केली नसल्यामुळे वरील आरोपींनी गावात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने त्यांना अटक करुन त्यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करावी अशी तक्रार अॅड. इरफान पाटील यांनी दिली आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींमुळे सय्यद वरवडे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काठावरचे बहुमत असलेल्या गावात सदस्य फोडाफोडी करून सरपंच पद काबीज केल्याने मोहोळ तालुक्यातील बहुतांश गावात धुसफूस सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस प्रशासनाने अशा गावांमध्ये नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.