वाखरी येथील मंगल कार्यालयात घटना : ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पंढरपूर ; ईगल आय न्यूज
गुरुवार ४ मे रोजी वाखरी येथील मंगल कार्यालयात लगीन घाई सुरू असतानाच वऱ्हाडी म्हणून आलेल्या महिलेने नव वधूसाठी आणलेले सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने उचलून पसार झाली. या संदर्भात पंढरपूर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान भोसे येथील एका मंगल कार्यालयात अशाच प्रकारे साडे तीन तोळे सोने गायब झाल्याची चर्चा आहे.
पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात लक्ष्मण श्रीरंग पोरे ( रा.वाखरी , तालुका पंढरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादनुसार, त्यांच्या मुलाचा विवाह सोहळा गावातील कृष्णा मंगल कार्यालयात आयोजित केला होता. नवरदेव पारण्यासाठी गेला असता मंगल कार्यालयात लगीन घाई सुरू होती. त्याच दरम्यान नवरी मुलिकडील वऱ्हाडी आले होते. याच वेळी मंगल कार्यालयात आलेल्या एका महिलेने नवरी साठी आणलेले गंठण मंगळसूत्र, जोडवी, बीचवे असा सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी घेऊन पळ काढला. सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर मंगल कार्यालयात एकच खळबळ उडाली. तातडीने पंढरपूर ग्रामीण पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस पथक तातडीने घटनास्थळी आले आणि मंगल कार्यालयातील सीसीटिव्ही फुटेज घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
घटना घडल्यानंतर तातडीने पोलीस पथक मंगल कार्यालयात दाखल झाले. त्यांनी सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन घटनेची माहिती घेतली. सीसीटिव्ही फुटेज मध्ये एक महिला मंगल कार्यालयात येताना आणि वर्हाडी म्हणून वावरताना स्पष्ट दिसून येते. तसेच दागिने असलेली पिशवी घेऊन जातानाही महिला दिसून येते. तिच्या सोबतीला आलेला एक पुरुष ही फुटेज मध्ये दिसून येत आहे. त्यावरून पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, भोसे तालुका पंढरपूर येथील एका मंगल कार्यालयात नेमत वाडी येथील विवाह सोहळा गुरुवार ४ एप्रिल रोजी होता. त्यावेळी सकाळी ११ते दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान नवरी मुलीसाठी आणलेले सुमारे साडे तीन तोळे सोन्याचे दागिने गायब झाले आहेत. मात्र या संदर्भात शुक्रवार पर्यंत पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही.
चौकट