शिवसेना तालुका उपप्रमुखाची आत्महत्या !

लग्न जमल्यानंतर गेला मैत्रीणीच्या घरी

टीम : ईगल आय मीडिया

औरंगाबाद पश्चिमचे तालुका उपप्रमुख तथा दौलताबाद ग्रा.पं. सदस्य सुनील प्रकाश खजिनदार यांनी विवाहित मैत्रिणीच्या घरात गळफास लावून गुरूवारी सायंकाळी आत्महत्या केली.त्यांच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त करून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत खुलताबाद पोलीस ठाण्यात नातेवाइकांचा जमाव एकत्र आला होता.
या प्रकरणी संबंधित महिलेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती दौलताबादच्या पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.


अधिक माहितीनुसार सुनील खजिनदार यांचे लग्न ठरले होते. मात्र, त्यांचे गावातीलच विवाहित मैत्रिणीच्या घरी जाणे-येणे होते. गुरुवारीही ते त्या मैत्रिणीच्या घरी गेले होते. तेथेच त्यांच्यात सुनील खजिनदार यांचे लग्न ठरल्यावरून वाद झाला. या वादातूनच खजिनदार यांनी सायंकाळच्या सुमारास मैत्रिणीच्या घरात गळफास लावला. त्याची माहिती कळताच पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पाठवला.


मात्र, शुक्रवारी सकाळी मृतदेह ताब्यास घेण्यास मृत खजिनदार यांच्या नातेवाइकांनी नकार दिला. सुमारे ५० पेक्षाही अधिकच्या संख्येने जमाव दौलताबाद पोलीस ठाण्यात एकत्र आला होता. संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जमावाने केली.


अखेर नातेवाइकांची समजूत घालून मृतदेह त्यांच्याकडे दिल्यानंतर सायंकाळपर्यंत सुनील खजिनदार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल होत असल्याचे पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!