टीम : ईगल आय मीडिया
गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने मोरबी जिल्ह्यात ड्रग्जविरोधात मोठी कारवाई केलीय. पोलिसांनी मालिया मियाणामधून ६०० कोटी रुपयांचे १२० किलो ड्रग्ज जप्त केले आहे.
या प्रकरणाचं ‘कनेक्शन’ पाकिस्तानचा ड्रग माफिया खालिद बख्शसोबत आहे. हे अमली पदार्थ पाकिस्तानमधूनच भारतात पाठवण्यात आल्याचंही बोललं जातंय. याबाबत पोलीस महासंचालक पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत.
गुजरात एटीएसने या प्रकरणी ड्रग्जसोबत ४ जणांना अटक केलीय. या प्रकरणातील आरोपी खालिदचा संबंध थेट दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी असल्याचंही समोर येत आहे. भारतात पाठवण्यात आलेल्या या ड्रग्जचं कनेक्शन पाकिस्तानसोबतच दुबईशी देखील असल्याचा आरोप होत आहे.
पाकिस्तानचा माफिया खालिदने भारतातील जब्बार आणि गुलाम नावाच्या तस्करांची दुबईतील सोमालिया कँटीनमध्ये भेट घेतली होती, अशीही माहिती मिळत आहे. पोलिसांनी या दोन्ही भारतीय तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत.