2 लाखासाठी तरूणाला बेदम मारहाण
सोलापूर : ईगल आय मीडिया
येथील अण्णासाहेब पाटील प्रशाला, सलगरवस्ती परिसरात खाजगी सावकारीतून एका तरूणाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी एका नगरसेवकासह 5 जणांविरूध्द गुन्हा. ही घटना सोमवार दि. 17 ऑगस्ट रोजी घडली.
प्रविण सिद्राम जाधव (वय 20, रा. न्यू हायस्कूल शाळेजवळ, सलगरवाडी, सोलापूर) असे जखमीचे नाव आहे. याने 6 महिन्यापुर्वी साडी विक्री व्यवसायासाठी नगरसेवक किसन जाधव याच्याकडून 50 हजार रूपये प्रतिमहिना 10 टक्के व्याजाने पैसे घेतले होते. परंतु लॉकडाऊन सुरू झाल्याने साडी विक्री व्यवसाय झाला नाही. त्यामुळे नगरसेवक खाजगी सावकार किसन जाधव याने कर्ज वसुलीसाठी तगादा लावला. प्रविण जाधव याची मावशी सातरस्ता येथील उत्कर्ष हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल होती, तिला पाहण्यासाठी तो तिथे गेला असताना खाजगी सावकार नगरसेवक किसन जाधव याची पत्नीही हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होती. त्यावेळी त्याने माझे घेतलेले 50 हजार रूपये आणि त्याचे व्याज असे मिळून 2 लाख रूपये कधी देणार अशी विचारणा केली. त्यावेळी साडी विक्रीचा व्यवसाय बंद आहे माझ्याकडे आता पैसे नाहीत, मी थोड्या दिवसात पैसे अॅडजस्ट करून देतो असे सांगितले. तेव्हा किसन जाधव याने, तू पैसे दे नाही तर मी काय करू शकतो हे तुला माहित आहे का तुला दाखवतो, असे म्हणून दमदाटी केली. त्यानंतर प्रविण जाधव आणि त्याचा मित्र रिक्षात बसून जात असताना सलगरवस्ती येथील अण्णासाहेब पाटील प्रशाले जवळ नगरसेवक जाधव याच्या सांगण्यावरून तन्मेश गायकवाड, तेजस गायकवाड, प्रेम नागेश गायकवाड, शुभम मरगु गायकवाड (सर्व रा. सेटलमेंट सोलापूर) यांनी मिळून चारचाकी गाडी व मोटारसायकलवरून येवून हातातील लोखंडी रॉड, हॉकी स्टीक, बेसबॉल बॅटने हातावर दंडावर उजव्या पायाच्या नडगीवर, पाठीवर मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अशी फिर्याद प्रविण जाधव याने सलगरवस्ती पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलीसांनी नगरसेवक किसन जाधवसह 5 जणांविरूध्द सावकार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भुसनुर करीत आहेत.