कर्ज फेडूनही जादा वसुलीसाठी धमकावले
सोलापूर : ईगल आय मीडिया
कर्जाची रक्कम फेडूनही आणखी दोन लाखांसाठी तगादा लावत एकाचे अपहरण केल्याप्रकरणी बापलेकांसह तिघा सावकारांवर फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदाशिव घोडके, गोपीनाथ घोडके, प्रकाश उर्फ मुकेश घोडके (सर्व रा.दमाणी नगर, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावे आहेत. याबाबत शितल सुरेश वाईकर (वय-४१, रा.मुरारजी पेठ,सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
शितल वाईकर याने सावकार सदाशिव घोडके याच्याकडून ३ लाख रूपये ७ टक्के व्याज दराने घेतले होते. त्यानंतर त्याने मध्यस्थी करून घोडके यांच्याकडून सतीश गलांडे यास ३ लाख, तर गणेश काशिद यास अडीच लाख रूपये घोडके याच्याकडून ७ टक्के व्याज दराने घेऊन दिले. या सर्वाची जबाबदारी शितल वाईकर याने घेतली. शितल तिघांचे मिळून ५३ हजार रूपये दरमहा व्याजापोटी सावकार घोडकेला देत होता. याच दरम्यान गलांडे याचा मृत्यू झाला. त्यानंतर सदाशिव घोडके याच्यासह त्याची दोन मुले गोपीनाथ आणि प्रकाश यांनी पैशासाठी शितलकडे तगादा लावला होता.
दरम्यान, शितलने त्याच्याकडे असलेल्या दोन गाड्या विकून घोडके यांना पैसे दिले. पैसे दिल्यावरही घोडके त्याच्याकडे आणखी दोन लाखांची मागणी करत होते. या त्रासाला कंटाळून शितल हा कर्वेनगर (पुणे) येथे नोकरीस गेला. त्यानंतर घोडके यांनी फोनवरून शितलला पैशासाठी तगादा लावला. शितलने फोन उचलणे बंद केल्यावर घोडके याच्या दोन्ही मुलांनी शितलच्या सोलापूरच्या घरी जाऊन आई आणि पत्नीला पैशासाठी धमकी दिली. दरम्यान, २०१९ मध्ये शितल हा सोलापुरातील घर विकण्यासाठी शहरात आला होता. हे कळल्यावर घोडकेच्या दोन्ही मुलांनी शितलला गाठून दम दिला.
हे प्रकरण वाढत गेल्यानंतर शितल यांच्या सासर्यांनी त्यांची दोन एकर जमिन घोडके यांना दिली. तरीही घोडके यांनी मध्यस्थी उर्वरित दोन मित्रांचे पैसे देण्यासाठी शितल यांच्याकडे तगादा लावला. याप्रकरणी शितल यांनी फौजदार चावडी पोलिसात तक्रार दिल्यानंतर सदाशिव,गोपीनाथ,प्रकाश घोडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटणेेचा पुढील तपास पोसई.देशमाने हे करीत आहेत.