तपासणी नंतर सापडला कोरोना पॉझिटिव्ह
मोहोळ : ईगल आय मीडिया
आजारपणास कंटाळून एका टेलरने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी मोहोळ शहरात उघडकीस आली. नंदकिशोर शंकर वजिरनाथ (वय ४५ वर्षे, रा. पोखरापूर ता. मोहोळ) असे आत्महत्या केलेल्या टेलरचे नाव आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे.
या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नंदकिशोर वजीर नाथ यांचा पोखरापूर गावात टेलरिंग चा व्यवसाय आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या उजव्या हाताला व पायाला मुंग्या येत असल्याने बधिरता आली होती. तसेच त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूची नस ब्लॉक झाली होती. यामुळे सोलापूर येथील एका डॉक्टरकडे त्यांचा इलाज सुरू होता. सतत दवाखाना व उपचार करून देखील कोणताच फरक पडत नसल्यामुळे ते सतत तणावात असायचे.
दरम्यान, नंदकिशोर वजिरनाथ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी मृतदेहाची कोरोना चाचणी केली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याने मृतदेहाचे शवविच्छेदन न करता अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेचे अभियंता लोमटे यांनी दिली.
बुधवार ( 28 रोजी) सकाळी 10 वाजता आपल्या चुलत्याला दवाखान्यात जातो असे सांगून घरातून बाहेर गेले होते. तेव्हापासून ते घरी आलेले नव्हते. गुरूवार २९ ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता मोहोळ शहराच्या हद्दीतील जुन्या शिवा ढाब्याजवळ नंदकिशोर यांनी आजारपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
या घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी समाधान वजिरनाथ यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आजाराने छळले होते, मृत्यूने केली सुटका