पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी संवेदनशील गुन्ह्याची तत्परतेने केली उकल
पंढरपूर : ईगल आय मीडिया
आढीव,( ता.पंढरपूर ) येथील आरोपीने लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने पळवून नेले असल्याबाबत दिनांक 17ऑगस्ट रोजी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. या मुलीस आरोपी समर्थ राजू कांबळे याने पळवून नेले होते अशी फिर्याद असून गुन्हा नोंद झाला होता. यामुळे आढीव परिसरात खळबळ उडाली होती.
या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार नितीन चवरे यांच्याकडे देण्यात आला, त्यानंतर पोलीस हवालदार नितीन चवरे व पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम यांनी पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला.
गुन्हयातील आरोपी समर्थ राजू कांबळे हा जत( जि.सांगली) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलीस हवालदार नितीन चवरे व पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम यांनी तात्काळ जत ( जि. सांगली ) येथे जाऊन खात्री केली असता आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीस घेऊन कराडकडे पोबारा केल्याचे समजले. तरीदेखील चवरे व कदम यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीच्या आधारे कराड, जि.सातारा येथे जाऊन केवळ 40 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या व पीडित अल्पवयीन मुलीची सुटका केली.
सदर मुलीस कायदेशीररित्या तिच्या आईच्या ताब्यात सुरक्षितरित्या देण्यात आले आहे. या गुन्ह्याची गंभीरता पाहून व तपासानंतर गुन्ह्यामध्ये कलम वाढ करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या नेतृत्वाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार नितीन चवरे,पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम व सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अन्वर आत्तार यांनी अतिशय शितफीने पार पाडली. गुन्हयाचा पुढील तपास पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात यांच्याकडे देण्यात आला आहे.