बार्शीतुन ब्रिझा कार चोरली

माढा पोलिसांनी आरोपीसह पकडली

टीम : ईगल आय मीडिया

बार्शी शहरातून चोरीस गेलेली मारुती कंपनीची ब्रिझा ही कार चोरुन पलायन करत असलेल्या चोरट्यास माढा पोलिसांनी नाकाबंदी करत काही तासांतच ब्रेझ्झा कार सह पकडले. ही घटना माढा शहरात आज पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली. या प्रकरणी अमजद अन्वर शेख ( वय-32 वर्ष, रा.बाशींगे प्लॉट, बार्शी) यास ताब्यात घेण्यात आले आहे.

माढा पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की, मारुती कंपनीची ब्रिझा कार नं. MH-13-CS 4141 बार्शी शहरातुन चोरीस गेलेली आहे व सदर गाडी माढ्याच्या दिशेने येण्याची शक्यता आहे. खात्रीशीर माहिती मिळाल्यावर पोलीसांनी तत्काळ माढा शहरातील कुर्डूवाडी बायपास चौक व छ.शिवाजी महाराज चौक येथे नाकाबंदी केली. 12.30 वाचे सुमारास कुर्डूवाडी बायपास चौक माढा येथे पोहेकॉ शिंदे, सपोफौ खंडागळे व इतर पोलीस स्टाफ हे वाहन तपासणी करत असताना ही  गाडी दिसून आली.

याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, गाडीतील इसमाने आपण ही गाडी भवानी पेठ बार्शी येथुन चोरल्याचे सांगितले. अमजद अन्वर शेख असे याचे नाव असून गाडी चोरीला गेल्याची तक्रार बार्शी शहर पोलीस ठाण्यात नोंद असल्याची खात्री करून माढा पोलिसांनी आरोपी बार्शी पोलीसांच्या ताब्यात दिला.

ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर बार्शी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक शाम बुवा, पोसई घोंगडे, सपोफौ खंडागळे, पोहेकॉ शिंदे, पोना देशमुख, पोना शिंदे यांनी केली.

Leave a Reply

error: Content is protected !!