पंचायत समितीचे माजी सभापती राजाराम जगताप व सहकाऱ्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल
मंगळवेढा : ईगल आय मीडिया
संत दामाजी साखर कारखान्याचे संचालक बापू मधुकर काकेकर यांना शिवीगाळ , दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पंचायत समितीचे माजी सभापती, आणि बालाजी नगर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक राजाराम निवृत्ती जगताप व दादासो दगडू काकेकर ( रा. कागष्ट ) यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद बापू मधुकर काकेकर ( वय ३४ रा. कागष्ट ) यांनी दिली आहे. ही घटना बुधवारी दुपारी१२ वाजण्याच्या सुमरास घडली आहे.
याबाबतीत अधिक माहिती अशी की, शेतातील रस्त्याच्या कारणावरून फिर्यादी व संशयित आरोपी यांच्यात जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मंगळवेढा कार्यालयासमोर वाद झाला.
त्यावेळी संशयित आरोपी राजाराम निवृत्ती जगताप व दादासो दगडू काकेकर यांनी, फिर्यादी बापू काकेकर यांना शिवीगाळ ,दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दाखल केल्याने, भादवी ५०४,५०६,३४ प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोना तुकाराम कोळी करीत आहेत.