वाखरीत 3 चोरटे पकडले

पंढरपूर : ईगल आय मीडिया

वाखरी ( ता.पंढरपूर ) येथे चोरी करण्यास आलेले 3 चोरटे वस्तीवरील रहिवाश्यांनी मोठ्या शिताफीने पकडले आहेत. आज पहाटे 2 वाजता ही घटना घडली असून त्यांना पंढरपूर ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वाखरी येथील जुना अकलूज रोड लगत असलेल्या सिकंदर ढवळे यांच्या वस्तीवर मंगळवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास काही चोरटे चोरीच्या उद्देशाने आले होते. यावेळी चोरट्यांनी घराशेजारी असलेल्या शेळ्यांच्या गोठ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आलेल्या आवाजामुळे वस्तीवर असलेल्या चंद्रकांत कोळी यांना जाग आली. चंद्रकांत कोळी आणि इतरांनी त्यांना पकडून ठेवले आहे.

कुत्र्यांनी घेरल्याने पळता आले नाही !

वस्तीवरील माणसे जागी झाल्याचे लक्षात येताच चोरट्यानी पळ काढला होता. मात्र वस्तीवर असलेल्या कुत्र्यांनी चोरट्याना तिन्ही बाजूनी घेरले, त्यामुळे चोरट्यांचा पळून जायचा मार्ग रोखला गेला, तोवर चंद्रकांत कोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तीन जणांना पकडले, आणि चोप दिला. या दरम्यान अन्य 3 ते चार जण पळून जाण्यात यशस्वी झाले. हे चोरटे बाय पास महामार्गावर काम करणारे परप्रांतीय असल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, पालखी महामार्ग बाय पास रस्त्याचे काम सुरू असून या रस्त्यावर काम करणारे हे परप्रांतीय मजूर असल्याचे समोर आले आहे. स्थानिक नागरिकांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता पोलिसांनी त्या चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.

मागच्या आठवड्यात पालखी मार्गावरील बाजीराव विहीर येथेही एका घरात खिडकीतून प्रवेश करण्याचा चोरट्याने प्रयत्न केला होता, मात्र घर मालकास जाग आल्याने चोरटे पळून गेले होते. मागील काही दिवसांपासून वाखरी परिसरात भुरट्या चोरीच्या घटना घडल्याने नागरिक सजग झाले आहेत, त्यामुळेच या चोरट्यांना पकडण्यात यश आल्याचे दिसते.

Leave a Reply

error: Content is protected !!