डोळ्यात मिरची पूड टाकून केला हल्ला
टीम : ईगल आय मीडिया
तिवसा शहरातील अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आशीर्वाद वाईन बारसमोर डोळ्यात मिरचीपूड टाकून, धारदार शस्त्राने वार करून, शिवसेना शहरप्रमुखाचा खून करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने तिवसा शहरात खळबळ उडाली आहे. अमोल पाटील ( वय 34 वर्षे ) असे मयत शिवसेना शहर प्रमुखाचे नाव आहे.
अमोल पाटील मित्रासोबत शनिवारी रात्री आशीर्वाद बारमध्ये गेला होता. मात्र बार बंद झाल्याने दोघंही बारसमोर बसले होते. यावेळी दोन ते तीन जणांनी अमोल पाटीलच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. त्यानंतर त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला जागीच ठार केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमा झाली होती,
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनास्थळावर मिळालेल्या काही माहिती आणि पुराव्यांच्या आधारावर काही तासातच चार आरोपींना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजीपंत येथून अटक करण्यात आली. अजूनही एक आरोपी पसार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रिता उईके यांनी दिली आहे. या प्रकरणातील आरोपी सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत.
अमोल पाटील याच्यावर यापूर्वी दोन हत्या केल्याचा आरोप होता. त्याला दीड महिन्यांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षासाठी जिल्ह्याबाहेर तडीपार होण्याचा आदेशही काढला होता. अवैध उद्योगातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे.
घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस निरीक्षक रिता उईके यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. अद्यापही आरोपींचा शोध लागला नाही. राष्ट्रीय महामार्गावर वर्दळीच्या ठिकाणी राजकीय पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याने जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.