टीम : ईगल आय मीडिया
टी आर पी घोटाळ्यातील आरोपी आणि रेटिंग एजन्सी बीआरसीचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ऑक्सिजनवर ठेवले असून प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे.
दासगुप्ता यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने टिआरपी घोटाळ्या प्रकरणी अटक केली होती. मुंबईतील एका न्यायालयाने या महिन्याच्या सुरुवातीलाच दासगुप्ता यांचा जामीनअर्ज फेटाळला होता. दासगुप्ता यांची टीआरपी घोटाळ्यात महत्वाची भूमिका असल्याचे वक्तव्य त्यावेळी न्यायालयाने केले होते.
दासगुप्ता यांना कथित बनावट टेलिव्हिजन रेटिंग्ज पॉइंट (टीआरपी) प्रकरणी अटक करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. मधुमेहाने पीडित असलेल्या दासगुप्ता यांना शनिवारी नवी मुंबई येथील तळोजा केंद्रीय तुरुंगातून रुग्णालयात नेण्यात आले. शुक्रवारी मध्यरात्री दासगुप्ता यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अतिशय वाढले.दासगुप्ता यांना मुंबईतील जेजे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांना ऑक्सिजन देण्यात येत असल्याचे एका अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले.
रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी आपल्या वृत्तवाहिनीच्या दर्शकांची संख्या वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपयांची कथित लाच दिली होती असे मुंबई पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे. या प्रकरणी रिपब्लिक tv चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती. सध्या ते जामिनावर मुक्त आहेत.