उत्तर प्रदेशात अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार
टीम : ईगल आय मीडिया
उत्तर प्रदेशात माणुसकीला काळिमा फासणारी, काळजाचा थरकाप उडवणारी आणि प्रचंड संतापजनक अशी घटना घडली आहे. एका १३ वर्षीय मुलीवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या डोळ्यांसह शरीराच्या इतर भाग कापला आणि गळ्याला फास लावून ओढत उसात नेउन टाकून दिले.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीतील ईसापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली पासूम याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
लखीमपूर खेरीतील पकरिया गावात या 13 वर्षीय मुलीचे कुटुंब राहते. दोन भाऊ, आई वडिलांसोबत राहणारी एकुलती मुलगी प्रातर्विधीसाठी घराबाहेर पडली होती, त्यानंतर ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला असता मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी ईसापूर पोलिसांत तक्रार नोंदवली.
पोलिसांनी शोध घेतल्यानंतर ऊसाच्या एका शेतात मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले असता, अहवालात मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं.मुलगी शौचासाठी शेतात गेल्यानंतर गावातील दोन तरुणांनी तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली. आरोपींनी पीडितेची हत्या करण्यापूर्वी प्रचंड हाल केल्याचंही समोर आलं आहे. क्रूरपणे पीडितेचे डोळे फोडले, त्याचबरोबर तिची जीभही कापली. गळ्याला फास लावून तिला ओढण्यात आलं. पीडितेचा जीव गेल्यानंतर मृतदेह ऊसाच्या शेतात फेकून देत आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
जिल्हा पोलिस अधीक्षक सत्येंद्र कुमार सिंह यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मुलीला परत आणू शकत नसलो तरी आरोपींचे असे हाल करू की त्यांना पाणी सुद्धा मागता येणार नाही, अशा सन्तप्त शब्दात सत्येंद्र कुमार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर या पाशवी घटनेनंतर माजी मुख्यमंत्री मायावती, अखिलेश यादव यांनी योगी सरकारला धारेवर धरले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, शवविच्छेदन अहवालाच्या आधारावरून पोलिसांनी दोन तरुणांवर बलात्कार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. संजय गौतम ( वय 19 वर्षे ) आणि संतोष यादव ( वय 25 वर्षे ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी ( 15 रोजी ) तीन डॉक्टरांच्या पथकाने छायाचित्रीकरणात शवविच्छेदन केले.
कठोर शासन झाल्यावरच असे गंभीर गुन्हे कमी होतील.