उपरी येथील विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

 दोन तोळे सोन्याबरोबर पिकअपसाठी पैसे आणण्याची मागणी

पंढरपूर : eagle eye news

महिंद्रा पीक अप वाहन घेण्यासाठी नवरा त्रास देतो म्हणून उपरी ( ता. पंढरपूर ) येथील विवाहितेने रविवारी विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात नवरा नवनाथ नागणे याच्यासह  सासरच्या 3 जणांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   उपरी येथील शीतल नवनाथ नागणे (रा.  नागणे वस्ती, उपरी, ता.  पंढरपूर ) या विवाहितेचा मृतदेह रविवार ( १९ रोजी )  विहरीत आढळून आला होता.

या प्रकरणी मयत शीतल यांचे भाऊ गणेश प्रल्हाद आसबे ( रा.  खरसोळी, ता. पंढरपूर ) यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादी नुसार, शीतल यांचे लग्न उपरी येथील नवनाथ नागणे यांच्या समवेत  १५ एप्रिल २०१२ रोजी झाले होते. लग्नात ५१ हजार रुपये हुंडा व अडीच तोळे देण्यात आले होते.

 लग्नानंतर  मागील ३ वर्षांपासून सौ.  शीतल यांचा पती नवनाथ हा तिचे सासू – सासरे यांच्या सांगण्यावरून मारहाण करून मानसिक  छळ करीत होता. पती नवनाथ हा शीतल हिच्याकडे  दोन तोळे सोन्याचा आहेर पाहिजे, अशी मागणी करीत होता.  त्याच बरोबर पिकअप गाडी साठी पैसे आणण्याची मागणीही केली जात होती.

 सदर मागणी पूर्ण न केल्याने शीतल यांचा छळ केला जात होता, अशी माहिती फिर्यादी गणेश आसबे तसेच मयत शीतलच्या आईने दिली आहे. या प्रकरणी आरोपी पती नवनाथ सह सासू, सासरे यांच्यासह चार जणांविरोधात  ४९८ सह भादंविच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!