पोलीस निरीक्षकांसह 2 पोलीस कर्मचारी जखमी
वेळापूर : ईगल आय मीडिया
वेळापूर (ता.माळशिरस, जि. सोलापूर) येथे अवैध हातभट्टी चालवणाऱ्या दारुच्या अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात वेळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे आणि पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुके, पोलीस नाईक महेरकर हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
आज पोलीस मोठी कारवाई करण्याची शक्यता !
पोलीस लवकरच या विरोधात कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पोलीस निरीक्षकच गंभीर जखमी असल्याने हे प्रकरण आता जास्त संवेदनशील बनलं आहे. याप्रकरणी जमावाविरोधात शनिवारी (28 मे) मोठी कारवाई होण्याचा अंदाज स्थानिकांकडून वर्तवण्यात येत आहे.
वेळापूर येथील पालखी चौक येथून काही अंतरावर पारधी समाजाची वस्ती आहे. तिथे अवैध हातभट्टी दारुचा अड्डा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विशेष म्हणजे ही हातभट्टी गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहे. मात्र, पोलिसांनी आतापर्यंत तिथे फारशी मोठी कारवाई केली नव्हती.
दरम्यान, पोलीस काल संध्याकाळी (28 मे) संध्याकाळी पारधी वस्तीत गेले. तिथे त्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. काही लोकांची चौकशी केली. मात्र, यावेळी
20 ते 25 महिला आणि पुरुषांनी पोलिसांवर हल्ला केला.
यावेळी पोलिसांनी जमावाला प्रतिकार करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला. मात्र, या गदारोळात पोलीस निरीक्षकांसह दोन पोलीस जखमी झाले.
जमावाच्या हल्ल्यात पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे आणि पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुके हे गंभीर जखमी झाले. तर पोलीस नाईक महेरकर यांना किरकोळ दुखापत झाली. जखमींना सध्या वेळापूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.