हात पाय आणि दगड बांधून टाकले विहिरीत
टीम : ईगल आय न्यूज
वाखरी शिवारातील याकूब शेख यांच्या विहिरीत भंडीशेगाव ( ता.पंढरपूर ) येथील लखन सुनील गांडुळे या 25 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे वाखरी, भंडीशेगाव परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की भंडीशेगाव येथील लखन गांडुळे ( वय 25 वर्षे ) हा युवक मागील काही दिवसापासून बेपत्ता होता. या संदर्भात त्याचा भाऊ शंभू सुनील गांडुळे याने पंढरपूर ग्रामीण पोलिसात तक्रार दिली होती. दरम्यान, सोमवारी ( दि.22 रोजी ) दुपारी एक वाजता वाखरी हद्दीतील याकूब शेख यांच्या शेतात लखन गांडुळे याचा मृतदेह हात पाय बांधलेल्या आणि केसरी रंगाच्या नायलॉन दोरीने दगड बांधलेल्या अवस्थेत तरंगताना दिसून आला.
याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस यांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढला. आणि त्याची ओळख पटवण्यात आली. मयताचा भाऊ शंभू सुनील गांडूळे याने मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव करीत आहेत.