स्वाभिमानीला बंडाचा खोडा !


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या आघाडीच्यावतीने राज्यपाल नियुक्त जागेसाठी विधान परिषदेत संधी देण्याचे निश्चित झाले होते. मात्र त्यांना संघटनेतूनच आव्हान दिले गेल्याने शेट्टी यांनी ही ब्यादच नको असा पवित्रा घेतला आहे. एरवी झुंजार, लढाऊ अशी ओळख असलेल्या आणि प्रत्यक्षात रक्त सांडून मैदानात उभा राहिलेल्या राजू शेट्टी यांनी घेतलेली ही भूमिका धक्कादायक आहे. सदाभाऊ खोत यांच्यासारखा खांद्याला खांदा लावून लढणारा गडी सोडून गेला तरीही शेट्टी खंबीरपणे उभा राहीले होते. मग कोणी तरी फेसबुकवर पोस्टी करून विधानपरिषदेवरील निवडीबाबत टीका केली असता थेट हत्यार टाकणारे आणि अस्वस्थता जाहीरपणे व्यक्त करणारे राजू शेट्टी हेच आहेत का असा प्रश्न पडतो.
शेट्टी यांनी केलेली चळवळ आणि संघर्ष फार जुना नाही त्यामुळे त्याची पुन्हा उगाळणी करणे उचित नाही.
2019च्या लोकसभा निवडणुकीपासूनच राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीसोबत गेलेला आहे. तत्पूर्वी 2014 च्या निवडणुकीत राजू शेट्टी यांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसोबत आघाडी केली होती. त्यावेळी जातीयवादी, धर्मांध आघाडीसोबत गेले म्हणून टीका होऊनही शांत राहिलेले शेट्टी आताच एवढे का अस्वस्थ झाले असा प्रश्न त्यांच्या समर्थकांसह तटस्थ निरीक्षकांनाही पडतो आहे. 2014 साली हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शेट्टी सलग दुसऱ्या वेळी निवडून गेले होते. दरम्यानच्या काळात भारतीय जनता पार्टीने सदाभाऊ खोत यांना अगोदर विधानपरिषद नंतर राज्यमंत्री करून राजू शेट्टी यांच्यापासून अलगद बाजूला केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारा नेता म्हणून राजू शेट्टी यांची महाराष्ट्रात ओळख झालेली आहेच, मात्र मागील सात-आठ वर्षात शेट्टी यांनी शेतकरी नेता ही आपली ओळख राष्ट्रीय पातळीवर उभा करण्याचा प्रयत्न केला. भविष्यात राजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेते म्हणून देशभर उभा राहिले तर भारतीय जनता पार्टीला ते परवडणारे नव्हते. राज्यातही भाजपची धोरणे ही शेतकऱ्यांना फारशी अनुकूल नव्हती, त्यामुळे शेट्टी यांची शेतकरी संघटना भविष्यात भाजपला डोईजड होईल हे ओळखून भाजप नेतृत्वाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडली. त्यानंतरच लोकसभा निवडणुक राजू शेट्टी यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सोबत लढवली. मात्र यावेळी राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव झाला. विधानसभा निवडणुकीतही राजू शेट्टी यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विधानसभेच्या ज्या जागा दिल्या त्यापैकी केवळ एकच जागा निवडून आली. तर राजू शेट्टी यांचा बालेकिल्ला असलेल्या शिरोळ विधानसभा
विधानसभा मतदारसंघातही स्वाभिमानीचा उमेदवार पराभूत झाला. त्यामुळे विधानसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहांमध्ये स्वाभिमानीचे प्रतिनिधित्व राहिले नव्हते. पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी प्रभावी आहे, कार्यकर्त्यांचे नेटवर्कही चांगले आहे,या कार्यकर्त्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेत राजू शेट्टी यांची असणे गरजेचे वाटते आहे. मात्र राजू शेट्टी यांची राज्यसभा हुकली, त्यानंतर विधान परिषदेत शेट्टी यांनी जावे अशा प्रकारचा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजू शेट्टी यांना पाठवला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विधान परिषदेच्या एका जागेसाठी एका नावाची शिफारस करावी आणि झालेल्या मिटिंगमध्ये सर्वसंमतीने राजू शेट्टी यांचे नाव मान्य करण्यात आले. त्यानंतरच राजू शेट्टी यांनी बारामतीला जाऊन विधान परिषदेसाठी होकार कळवला. मात्र त्यानंतर संघटनेच्या शिडात राजकारणाचे वारे भरले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सावकार मादनाईक, प्राध्यापक जालिंदर पाटील यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर उघडपणे राजू शेट्टी यांच्या विधानपरिषद आव्हान दिले. आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये आणखी एक बंड उभा राहत असल्याचे समोर आले. ह्यापूर्वीच स्वाभिमानी मध्ये सदाभाऊ खोत यांच्या रूपाने एक फूट पडलेली होती तर, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद मिळालेल्या रविकांत तुपकर यांनीसुद्धा विधानसभेच्या तोंडावर सदाभाऊ खोत यांच्या मंचावर हजेरी लावली होती. त्यामुळे त्यामुळे संघटनेत आणखी एक फूट पडू नये यासाठी राजू शेट्टी यांनी आपल्याला विधानपरिषद नको अशी भूमिका जाहीर केली. त्यानंतर राजू शेट्टी यांच्या समर्थनार्थ स्वाभिमानीचे कार्यकर्ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहेत. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे.
स्वाभिमानी संघटनेमध्ये शेट्टी हे निर्विवाद सर्वोच्च नेते आहेत. त्यामुळे त्यांची ही भूमिका कार्यकर्त्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि एकूणच स्वाभिमानीच्या पुढील वाटचालीसाठी अडचणीची ठरणारी आहे. शेट्टी यांनी यापूर्वी खोत, तुपकर यांना संधी दिलेली आहे, तर सावकार मादनाईक यांना यापूर्वी विधानसभेसाठी दोन वेळा उमेदवारी दिलेली आहे. राजू शेट्टी यांनी त्यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावून प्रयत्न केले तरीही मादनाईक जिंकू शकले नाहीत. मदनाईक यांचे स्वतःचे हे अपयश असू शकते. या पार्श्वभूमीवर मादनाईक यांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी संघटनेत आपल्यावर अन्याय झाला अशी ओरड करण्याचे काहीएक कारण नव्हते. आज संघटना प्रतिकूल परिस्थितीत असताना संघटनेचा प्रमुख नेता सभागृहात जात असताना कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आनंदच व्हायला हवा, मात्र पक्षप्रमुखास आव्हानदिल्यामुळे भविष्यात स्वाभिमानाची वाटचाल अधिक खडतर आणि नाजूक झालेली आहे. अगोदरच आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार उल्हास पाटील, पंजाबराव पाटील असे काही बिनीचे शिलेदार यापूर्वी संघटनेतून बाहेर पडल्यामुळे स्वाभिमानी कमजोर झालेली आहे. अशा परिस्थितीत संघटनेला ताकद देण्यासाठी तिचे अस्तित्व टिकवण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी राजू शेट्टी यांच्या पाठीशी उभा राहणे गरजेचे होते, परंतु, तसे होताना दिसत नाही. स्वाभिमानी मध्ये बंडाचा खोडा कुणी घातला याचा शोध शेट्टी घेतीलही मात्र तेवढ्या मुळे स्वाभिमानी झालेले नुकसान भरून निघेल असे नाही.

राज्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता, शेतकरी संघटना मजबूत आणि राजकीय दृष्ट्या प्रभावी असणे आवश्यक आहे. शेतकरी हा कधीही संघटित न होणारा वर्ग आहे. त्याच्या प्रश्नासाठी संघर्ष करणारी संघटना हवीच आहे शरद जोशी यांच्यानंतर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचे प्रभावी संघटन उभा करून राज्यातील आणि देशातील प्रमुख राजकीय पक्ष, प्रस्थापित व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे केले होते. हा इतिहास लक्षात घेता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अस्तित्व ज्या व्यवस्थेला नको आहे नको त्या व्यवस्थेने स्वाभिमानीत बंडाचा खोडा घातला असावा अशी शंका उपस्थित होत आहे.मात्र राजू शेट्टी यांनी संघटनेतील अशा प्रकारच्या दबावाचे राजकारणाला बळी न पडता शेतकऱ्यांच्या हितासाठी सभागृहात असावे अशी अपेक्षा सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही लागलेली आहे, बंडाचा हा खोडा सोडवून राजू शेट्टी यांनी विधानपरिषदेत जावे ही लोकभावना आहे हे मात्र नक्की

Leave a Reply

error: Content is protected !!