चटका लावणारी एक्झिट !


हिंदी सिनेमा सृष्टीने दोन दिवसात आपले दोन अनमोल तारे गमावले आहेत. अगोदर चतुरस्त्र अभिनेता इरफान खान यांच्या अकाली निधनाचा धक्का पचवत असलेल्या बॉलिवूडला गुरुवारी सकाळीच दुसरा धक्का बसला तो जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाचा.
इरफान खानच्या दुःखात असलेल्या भारतीय सिने रसिकांच्या काळजाचा ठोका चुकला तो गुरुवारी भल्या सकाळी . बुधवारी रात्रीच अभिनेता ऋषी कपूर यांना एन एच रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे वृत्त आले. आणि गुरुवारी सकाळी 8.45 च्या दरम्यान त्यांनी जगाचा निरोप घेतला. बिग बी अमिताभ यांनी ‘ ऋषी गेला, मी उध्वस्त झालोय ‘ हे ट्विट केले आणि लगेचच ऋषींचे पुत्र रणवीर कपूर यांनीही त्यास दुजोरा दिला. त्याचबरोबर देशभर दुःखाचे मळभ दाटून आले. मेरा नाम जोकर मध्ये राजकपूर यांच्या बालपणाची भूमिका साकारताना बाल कलाकार म्हणून काम केलेल्या ऋषी कपूर यांना कपूर खानदानाचा संपन्न वारसा होता. म्हणून त्यांची बॉलिवूड एन्ट्री सहज सोपी होती. मात्र इथे टिकून राहणे, तेसुद्धा तब्बल 4 दशके हे अंगभूत प्रतिभेशिवाय अशक्य होते. यापूर्वी कपूर घराण्यातील राजीव कपूर, रणधीर कपूर अशा चेहऱ्यांना प्रेक्षकांनी नाकारले होतेच, त्यामुळे सुमार चेहरेपट्टी आणि थूलथूलीत शरीरयष्टी असलेल्या ऋषी कपूर याना आपल्या मर्यादा लक्षात घेऊनच वाटचाल करावी लागली.
बॉबी, कर्ज, हिना, प्रेम रोग, प्रेमग्रंथ, नगीना, बोल राधा बोल यासारखे चित्रपट अपवाद म्हणता येतील. बाकी इतर सिनेमात ऋषी कपूर यांनी सहनायक म्हणून पडदा share करण्यालाच प्राधान्य दिले.
अमर अकबर अँथनी पासून त्यांनी बहुतांश सिनेमात सहनायकाची भूमिका स्वीकारली.
चांदणी, नगीना, दामिनी, दिवाना, दरार, घराना, याराना, विजय, आझाद देश के गुलाम, सरगम, सागर अशा अनेक चित्रपटात ऋषी कपूर सहनायकाच्या भूमिकेत दिसले. यातील बहुतांश चित्रपट तिकीट खिडकीवर यशस्वी झाले असले तरी त्याचे सर्वस्वी श्रेय त्यांना मिळाले नाही. म्हणूनच अगोदर अमिताभ, विनोद खन्ना, धर्मेंद्र, जितेंद्र यांच्या समकालीन, नंतर सनी, अनिल, जॅकी, संजय दत्त यांच्या काळातही ऋषी कपूर दुय्यम भूमिका स्वीकारत राहिले.
त्यांच्या नंतर आलेल्या सलमान, आमिर, शाहरुख, ऋत्विक रोशन, अक्षय कुमार, अजय देवगण यांच्या समोर ऋषी कपूर यांनी चरित्र भूमिका केल्या. आर के बँनरच्या आ आब लौट चले या चित्रपटाचे दिग्दर्शन ही त्यांनी केले,मात्र तो चित्रपट अपेक्षेप्रमाणे चालला नाही. नेहमी पडद्यावर स्वेटर परिधान करून वावरणे ही त्यांची वेगळी ओळख होती. थूलथूलीत शरीर यष्टी असूनही ऋषी कपूर यांचे नृत्यामधील प्रावीण्य कुणालाही हेवा वाटावा असे होते. पडद्यावरील त्यांचे सहज सुंदर पदलालित्य मनमोहक होते, आघाडीच्या अभिनेत्रींसोबत पडद्यावर नृत्य करताना ऋषी कपूर कुठेही कमी पडल्याचे दिसून आले नाहीत.
अभिनेत्री नीतूसिंग यांच्यासोबत घरोबा थाटला तरीही ऋषी कपूर यांचा अभिनय प्रवास मात्र जोमाने सुरूच होता. गेल्या 4 दशकांपासून त्यांची सुरू असलेली अभिनय सेवा मुलगा रणवीर कपूर स्टार झाला तरीही सुरू होती.
2018 साली त्यांना कँसर झाल्याचे निदान झाले आणि ऋषी कपूर उपचारासाठी परदेशी गेले. ट्विटरवर ते नेहमी सक्रिय असत आणि अनेकवेळा माध्यमांना बातम्यांसाठी विषय ठरतील अशा भडक पोस्ट त्यांनी केल्या होत्या. त्यांचा सोशल मीडियावरील वावर चर्चेत राहिला होता.व
उपचार करून परतल्यानंतर ते प्रसिद्धी आणि सिनेमापासून काहीसे दूर होते. मात्र बुधवारी रात्री त्यांना तब्येत बिघडल्याने रुग्णालयात न्यावे लागले आणि लगेचच गुरुवारी सकाळी काही तासातच त्यांनी जीवन पटावरुन कायमची एक्झिट घेतली. त्यांचा जीवनपट संपला असला तरी रुपेरी पटावरील त्यांची अनेक पात्रे रसिकांचे पुढच्या अनेक दशकांत मनोरंजन करीत राहतील.
गेल्या 2 महिन्यापासून बॉलिवूड कोरोना मुळे संकटात सापडले आहे, शेकडो कोटी रुपयांचे नवीन चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नसल्याने निर्माते, वितरक आणि कलाकार मंडळी चिंताग्रस्त झालेली असतानाच दोन दिवसात अगोदर इरफान खान आणि नंतर ऋषी कपूर असे दोन प्रतिभा संपन्न कलाकार गमावल्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. बॉलिवूड यातून सावरेलही मात्र बॉलिवूडच्या सुवर्णकाळाच्या वाटचालीचा सक्रिय सहभागी साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्याची एक्झिट प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली. हे मात्र नक्कीच !

Leave a Reply

error: Content is protected !!