मागील 3 दशकात आपल्या दमदार अभिनयामुळेे बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता इरफान खान याचे आज निधन झाले. colon infection मुळे त्याला मंगळवारी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र बुधवारी सकाळी त्याने 53 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. लंडनमध्ये कॅन्सरवर उपचार केल्यानंतर तो गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये भारतात परतला होता.
राष्ट्रीय नाट्य अकादमी मधून अभिनयाचे धडे गिरवलेल्या इरफान खानने 1988 मध्ये सलाम बॉम्बे मध्ये छोटासा रोल केला होता. त्यानंतर भारत एक खोज, चंद्रकांता अशा दूरदर्शन मालिकांमध्ये अभिनयाची छाप सोडल्याने त्याची एंन्ट्री बॉलिवूड मध्ये झाली. 2004 साली आलेल्या मकबूल मध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखवली.
पानसिंग तोमर, लंच बॉक्स, हिंदी मिडीयम, पिकू,
‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘तलवार’, यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने कसदार भूमिका साकारल्या होत्या. हॉलिवूड च्या द अमेझिंग स्पायडरमॅन, जुरासिक वर्ड, लाईफ ऑफ पी अशा चित्रपटात काम करून जागतिक पातळीवर वाहवा मिळवली.
बॉलिवूडमध्ये आघाडीचा अभिनेता हे स्थान मिळवलेले नसतानाही इरफान खान याने आपल्या अभिनय बळावर पानसिंग तोमर, लंचबॉक्स, हैदर, हिंदी मिडीयम असे चित्रपट यशस्वी करून दाखवले. ग्लॅमरस नसूनही अभिनयाच्या जोरावर चित्रपट हिट करून दाखवणारा नाना पाटेकर, ओम पुरी, नसिरुद्दीन शहा अशा अभिनेत्यांच्या रांगेत इरफान खानने स्थान मिळवले होते. त्यामुळेच फिल्मफेअर, राष्ट्रीय पुरस्कार त्याने मिळवले होते. त्याच्याकडून भविष्यात खूप चांगल्या कामगिरीच्या अपेक्षा होत्या.
इरफान खानने मार्च २०१८ मध्ये कॅन्सर झाल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर तो उपचारासाठी लंडनला निघून गेला होता. २०१९ मध्ये परतल्यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. १३ मार्च रोजी त्याचा नवीन अंग्रेजी मीडियम चित्रपट रिलीज होणार होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे ६ एप्रिल रोजी तो डिजीटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला. या चित्रपटात तील इरफान च्या अभिनयाचे समीक्षकानी खूप कौतुक केले होते. मात्र अचानक निधन झाल्यामुळे ‘अंग्रेजी मीडियम’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.
करिअरमध्ये इरफानने ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील योगदानासाठी २०११ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता.
इरफान खान यांच्या अकाली exit मुळे बॉलिवूड एका दर्जेदार अभिनेत्यास कायमचा मुकला आहे.