एकाच वेळी 49 चित्रपट साईन करणाऱ्या अभिनेत्याला कशासाठी सोडावा लागला “डर” चित्रपट ?
टीम : ईगल आय मीडिया
हिंदी सिनेमाला सुपरस्टार देणाऱ्या डर या सुपरहिट चित्रपटात शाहरुख खान ची भूमिका अगोदर दुसऱ्याच अभिनेत्याला दिली होती. शाहरूख चं नशीब चांगलं म्हणून त्या अभिनेत्याने चक्क यश चोप्राचा डर सिनेमा वेळ नसल्याचे कारण देत सोडून दिला आणि ‘क क क किरण’ करीत शाहरुख सुपरस्टार झाला.
त्याचं झालं असं की, 1990 साली आलेला ‘आशिकी’ हा चित्रपट सुपरहिट झाला होता आणि त्यातील लंबे झुलफोवला राहुल रॉय तेव्हा तरुण, तरुणींना भलताच भावला होता. आशिकी आणि राहुल ची क्रेझ पाहून निर्मात्यांची राहुल च्या दारात अक्षरशः रांग लागली. एक वेळ अशी होती की, राहुल रॉय ने एक दोन डझन नाही तर तब्बल 49 चित्रपट साईन केले होते. त्यात 49 मध्येच यश चोप्रा दिग्दर्शक असलेला डर हा चित्रपटसुद्धा होता.
राहुल राय ने 49 चित्रपट स्वीकारल्याने बॉलिवूड मधील इतर कलाकारांना चित्रपट मिळणे दुरापास्त झाले. तेव्हा चित्रपट निर्मिती सुद्धा कमी होत होती. त्यामुळे शेवटी चित्रपट कलाकार संघटनेने यावर हरकत घेतली, किती चित्रपट एकावेळी साईन करावेत याबाबत काही नियम बनवले. तर दुसऱ्या बाजूला या सेट वरून त्या सेट वर धावपळ करून राहूल रॉय ची दमछाक होऊ लागली, डेट्स मिळत नसल्यामुळे निर्माते वैतागले. शेवटी राहुल रॉय ने अनेक चित्रपट सोडण्याचे ठरवले आणि जवळपास 25 चित्रपट सोडून दिले, त्यांचे करार रद्द केले. त्यामध्येच ‘डर’ या चित्रपटाचा समावेश होता.
राहुल ने डर सारखा सिनेमा सोडला आणि तो शाहरुख खानला मिळाला. डर सोडल्याचा राहुल रॉयला नंतर पश्चाताप झाला. कारण आशिकी सारखे यश परत त्याला मिळाले नाही, जे चित्रपट मिळाले त्यातील बहुतांश फ्लॉप गेले, जे चालले त्याचे श्रेय चित्रपटातील इतर कलाकारांनी नेले आणि राहुल रॉय सुद्धा नंतर फ्लॉप कलाकार ठरला. डर केला असता तर त्याच्या नावे आणखी एक सुपरहिट चित्रपट आला असता आणि त्याचे करियर आणखी काही वर्षे चालले असते.
मात्र हे सगळे होणार नव्हते म्हणूनच त्याला यश चोप्रा सारखे बॅनर आणि डर सारखा चित्रपट सोडण्याची दुर्बुद्धी सुचली. कपिल शर्मा शो मध्ये डर सोडण्याचा किस्सा सांगताना राहुल च्या चेहऱ्यावर पश्चात्ताप दिसून येत होता. असो, तात्पुरत्या स्वरूपात शाहरुख खानच्या ऐवजी राहुल रॉय ‘क क क किरण’ म्हणताना कसा दिसला असता ? याची आपण कल्पना तरी करूयात की.