कपूर कुटुंबाला वर्षभरात दुसरा धक्का !
टीम : ईगल आय मीडिया
‘राम तेरी गंगा मैली’सारख्या चित्रपटांतून प्रसिद्ध झालेले अभिनेते राजीव कपूर यांचे मंगळवारी (9 फेब्रुवारी) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. मागील वर्षी एप्रिल मध्ये ऋषी कपूर यांचे निधन झाले, त्यानंतर वर्षभरात कपूर कुटुंबाला हा दुसरा धक्का बसला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीव कपूर यांना इनलिंक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी करिनाचे वडील अभिनेते रणधीर कपूरही रुग्णालयात आले होते. प्रयत्न करूनही डॉक्टर राजीव यांचा जीव वाचवू शकले नाहीत.
‘मी माझा छोटा भाऊ गमावला आहे. राजीव आता या जगात नाही. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण त्यांना वाचवता आले नाही.’ रणधीर यांनी असेही म्हटले आहे की, ते आता आपल्या भावाच्या पार्थिवाची वाट पाहत आहे. अशा शब्दात रणधीर कपूर यांनी ट्विट करून यांनी दुजोरा दिला.
नीतू कपूर यांची पोस्ट
राजीव कपूर यांचा फोटो शेअर करताना दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची पत्नी अभिनेत्री नीतू कपूर यांनी ‘रेस्ट इन पीस’, असे म्हटले आहे.
तीन कपूर भावांमध्ये राजीव हे सर्वात लहान आहेत. गेल्या वर्षीच ऋषी कपूर यांचे निधन झाले होते, त्यामुळे या दुःखातून कपूर कुटुंब अद्याप सावरलेले नव्हते आणि आता राजीव यांच्या मृत्यूमुळे कपूर कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
राजीव कपूर यांची कारकीर्द ! राजीव कपूर यांनी आपल्या करिअरची सुरूवात ‘जिम्मेदार’ या चित्रपटातून केली होती. तथापि, त्यांना खरी ओळख राज कपूर दिग्दर्शित 1985मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून मिळाली. चित्रपटात राजीव यांच्यासोबत अभिनेत्री मंदाकिनी मुख्य भूमिकेत झळकली होती. या दोघांनाही प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. यानंतर ते आणखी काही चित्रपटांमध्ये झळकले होते.
अभिनयात यश न मिळाल्यानंतर राजीव यांनी पुन्हा निर्माता म्हणून काम करण्यास सुरूवात केली. तसेच ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘प्रेम ग्रंथ’ हा चित्रपट राजीव कपूर यांनी दिग्दर्शित केला होता. त्यांनी ‘हिना’ आणि ‘आ अब लौट चले’ यासारख्या चित्रपटांची देखील निर्मिती केली आहे.