पंढरपूर तालुक्यात ऊस वाढीसाठी पोषक वातावरण, दमदार पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

मान्सून आगमनाच्या बातम्या धडकत असताना, पंढरपूर तालुक्यात मात्र अद्याप मोठा पाऊस झालेला नाही. दररोज वातावरण निर्मिती होते. आकाशात ढग जमतात, मात्र पेरणीयोग्य पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्याने अद्याप पेरणीला सुरू केलेली नाही. मशागतीची कामे मात्र वेगात सुरू आहेत.
उजनी धरण तसेच वीर, भाटघर धरणातून मिळालेल्या पाण्यामुळे ऊस, केळी तसेच फळबागा यंदा जोमात आहे. जून- जुलै महिण्यात पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. पंढरपूर तालुक्यात उसाखालील क्षेत्रात वाढ झालेली आहे. उन्हाळी हंगामात पाणी मिळाल्यामुळे उसाची वाढ चांगली झाली आहे. को २६५ जातीच्या ऊसाला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिलेले दिसून येते. गेल्या दोन-तीन वर्षात हुमनी आळीचा को ८६०३२ या उसाला फटका बसला होता. ही बाब लक्षात घेता २६५ जातीच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोबतच डाळिंबाचे क्षेत्र वाढले आहे. यंदा मान्सूनचे आगमन वेळेत झालेले असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पंढरपूर तालुक्यात १४ जूनअखेर सरासरी ४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.बाजरी, सोयाबीन, तूर आदीच्या पेरणीसाठी शेत तयार केले जात आहे. ऊस पिकाच्या वाढीसाठी सध्या पोषक वातावरण आहे. बांधणी करून खताची मात्रा दिली आहे. वेलवर्गीय तण काढणी तसेच ठिबक सिंचन संच जोडणीही सुरू आहे. मान्सून आगमनाच्या बातम्या धडकत असताना शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

मान्सूनचे आगमन होत असताना, कृषी विभागाकडून ही तयारी सुरू झाली आहे. शाहीरमळा वाखरी येथे बळीराजा स्वयंसहायता शेतकरी बचत गटाच्या वतीने बांधावर जाऊन शेतकऱ्यांना खते व कीटक नाशके यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी रविंद्र कांबळे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!