गाळप आणि सरासरी उतारा यामध्ये प. महाराष्ट्राचे वर्चस्व
पुणे : ईगल आय मीडिया
सन 2019-20 च्या गाळप हंगामात राज्यात 545 लाख 26 हजार टन उसाचे गाळप झाले. 11.30 टक्के सरासरी साखर उताऱ्यानुसार 61 लाख 61 हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. सन 2018-19 च्या हंगामात साखर उत्पादन 107.20 लाख टन झाले होते. त्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन सुमारे 45.59 लाख टनांनी घटले आहे. साखर आयुक्तालयाने याबाबतचा अहवाल जाहीर केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर सहकारी साखर कारखान्याने राज्यात सर्वाधिक 15 लाख 6 हजार 610 टन उसाचे गाळप करत 18 लाख 18 हजार 180 क्विंटल साखरेचे उत्पादन करत अग्रस्थान पटकाविले. सांगली जिल्ह्यातील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना युनिट नंबर 1 साखराळे (सांगली) कारखान्याचा साखर उतारा 13.11 टक्के इतका सर्वाधिक आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह सातारा, सोलापूर, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी पहिल्या दहा कारखान्यांमध्ये स्थान मिळविले आहे.
या बाबत माहिती देताना साखर संचालक (प्रशासन) उत्तम इंदलकर म्हणाले की, यंदाच्या गाळप हंगामात 147 साखर कारखाने सुरू झाले. या हंगामात दुष्काळ, अतिवृष्टी व महापुराचा सामना करावा लागला. एकूणच ऊस उपलब्धता कमी असल्याने साखर उत्पादनात मोठी घट अपेक्षित होती. हेक्टरी ऊस उत्पादकतेतही मोठी घट झालेली आहे. 2018-19 मध्ये हेक्टरी ऊस उत्पादकता 90 टन होती. ती 2019-20 मध्ये सुमारे 17 टनांनी घटून 73 टन झाली आहे.
हंगामात सर्वाधिक साखर उत्पादन घेणारे पहिले 10 कारखाने पुढीलप्रमाणे (आकडे क्विंटलमध्ये) : जवाहर सहकारी (कोल्हापूर) 18,18,180 सह्याद्री (सातारा) 15,31,000, कृष्णा (सातारा) 13,87,650, विठ्ठलराव शिंदे (सोलापूर) 13,30,050, जरंडेश्वर शुगर (सातारा) 12,97,100, दत्त शिरोळ (कोल्हापूर) 12,65,230, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना युनिट नंबर 1 साखराळे (सांगली) 11,52,800, दालमिया-दत्त आसुर्ले (कोल्हापूर) 11,51,990, सोमेश्वर (पुणे) 11,08,950, अंबालिका (अहमदनगर) 11,05,000.
साखर उतारा : सांगली, कोल्हापूर आघाडीवर
सरासरी साखर उताररयामध्ये सांगली, कोल्हाूपर आणि सातारा जिल्ह्याचे अग्रस्थान कायम आहे. सांगलीतील 5, कोल्हापूरचे 3 आणि सातारा जिल्ह्यातील 2 कारखान्यांनी पहिल्या दहा साखर कारखान्यात स्थान पटकाविले आहे.
सर्वाधिक उतारा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना युनिट नंबर 1 साखराळे ( सांगली )ने 13.11 टक्के मिळविला. त्यापाठोपाठ निनाईदेवी-दालमिया (सांगली) 13.06 टक्के, देशभक्ता रत्नाप्पा कुंभार पंचगंगा (कोल्हापूर) 13.05 टक्के, ओलम अॅग्रो-हेमरस (कोल्हापूर) 12.86 टक्के, जरंडेश्वटर शुगर (सातारा) 12.86 टक्के दूधगंगा-वेदगंगा (कोल्हापूर) 12.85 टक्के, सह्याद्री (सातारा) 12.82 टक्के, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना युनिट नंबर 2 वाटेगाव (सांगली) 12.77, टक्के, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना युनिट नंबर 3 कारंदवाडी (सांगली) 12.75 टक्के, सोनहिरा (सांगली) 12.70 टक्के याप्रमाणे उतारा मिळविला.