भीमा खोऱ्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ
पुणे : ईगल आय मीडिया
जिल्ह्यात पावसाचे धुवाँधार आगमन झाले आहे, मुळा – मुठा नदीच्या उपखोऱ्यात मागील दोन दिवसांत अतिवृष्टी सुरु असून भीमा नदीच्या खोऱ्यातील सर्व धरणे वेगाने भरू लागली आहेत. याचा फायदा लवकरच उजनी धरणासही होणार आहे.
मागील दोन महिन्यापासून पुणे, सातारा जिल्ह्यांवर रुसलेला पाऊस अखेर दिलदार झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यात कुठे अतिवृष्टी तर कुठे जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठा वेगाने वाढतो आहे. ४ ऑगस्ट रोजीमुळा -मुठा नदीच्या खोऱ्यात ९ धरणांवर ६० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस मुळशी धरणावर १९७ मिमी इतका झाला आहे. तर पानशेत १७७, टेमघर १७० , वरसगाव १६५, पवना १०३ मिमी इतकी नोंद झाली आहे. खडकवासला ६८ तर आंध्रा ६५ मिमी, भामा आसखेड ५०, वडिवले ६०, कासारसाई ६० मिमी, कळमोडी ४५, चासकमान ३७ मिमी एवढा पाऊस झाला आहे.
भीमा नदीच्या खोऱ्यातील प्रमुख धरणांवर ४ ऑगस्ट अखेर कळमोडी 435 मिमी ,चासकमान 395 मिमी, भामा आसखेड 363 मिमी ,वडिवले 858 मिमी, आंध्रा 436 मिमी, पवना 664 मिमी, कासारसाई 465, मुळशी 1179, टेमघर 1210 मिमी . वरसगाव 863 मिमी, पानशेत 910 मिमी, खडकवासला 399 मिमी, एवढा पाऊस नोंदला गेला आहे.
खडकवासला ५० टक्के , कळमोडी ५२ टक्के , कसरसाई ५२ टक्के , आंध्रा ७३ टक्के इतकी भरली आहेत. उर्वरित धरणांतील पाणीसाठा अद्यापही ४० टक्केच्या आसपास असल्याचे दिसते.
गेल्या दोन दिवसात भीमा नदीच्या खोऱ्यात सर्वच धरणांवर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणांतील पाणीसाठा वाढतो आहे.
दरम्यान नीरा नदीच्या खोऱ्यात पावसाने आपली या हंगामातील तूट भरून काढली आहे, गुंजवणी धरणावर 909 मिमी , नीरा देवघर धरणावर 768 मिमी, भाटघर 360 मिमी, वीर धरणावर २७५ हमी इतका पाऊस नोंदवला गेला आहे.