वांग्याला विक्रमी भाव : 1352 रुपये कॅरेट

धोंडेवाडी च्या तरुण शेतकऱ्यांस वांगी ठरली लाभदायक

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गेल्या महिन्याभरापासून वांग्याला मार्केटमध्ये चांगला भाव मिळत असून या वांग्याच्या शेतीमुळे धोंडेवाडी ( ता. पंढरपूर ) येथील तरुण शेतकरी मात्र मालामाल झाला आहे. हॉस्पिटलमध्ये काही काही हजार रुपयांची नोकरी करणारा युवक वांग्यामुळे लखपती झाला आहे. 18 ऑक्टोबर रोजी त्याच्या वांग्याला पंढरपूर च्या मार्केटमध्ये चक्क 1352 रुपये एवढा विक्रमी भाव मिळाला आहे. त्यांचा वांग्याचा प्लॉट आणि गुणवत्ता सुद्धा नजरेत भरणारी असून राज्यभरातून शेतकरी भेटून, फोनवरून त्यांच्याकडून वांग्याच्या शेती संदर्भात मार्गदर्शन घेत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून भाजीपाला मार्केटमध्ये वांग्याचे भाव तेजीत आहेत. किरकोळ विक्री 80 ते 120 रुपये किलो चालू आहे. वातावरण पोषक असल्याने वांग्याची प्रतवारी सुद्धा चांगली आहे. त्यामुळे बाजारात येणारे वांगे घेण्यासाठी गृहिणींची पावले आपसूक वळत आहेत. वांग्याच्या दराने शंभरी ओलांडली तरीही बाजारभाव थांबताना दिसत नाही.

2015 ते 2020 पर्यंत एका खाजगी हॉस्पिटल मध्ये जॉब केला, पण कमी पगार असल्यामुळे जॉब सोडला. तेव्हा पुढं काय करायचं असा मोठा प्रश्न होता. त्यानंतर फेब्रुवारी 2020 पासुन शेतीकडे वळलो. मी शेती करताना कधीच किती भाव मिळेल याचा विचार करत नाही, तर मी केलेल्या खर्चाच्या दुप्पट उत्पन्न कसे मिळेल आणि त्यासाठी आपल्याला किती माल काढावा लागेल ते ही कमीत कमी भाव लक्षात घेतो तेव्हाच मी कोणत्याही पिकाची लागवड करतो. सर्वात महत्वाचं म्हणजे फवारणी आणि खते देणे या दोन गोष्टी मी स्वतः केलेल्या आहेत. कोणत्याही मजुरावर अवलंबून न राहता.

:- माधव तुकाराम चव्हाण, रा.धोंडेवाडी तालुका-पंढरपूर जिल्हा-सोलापूर

18 ऑक्टोबर रोजी धोंडेवाडी ( ता.पंढरपूर ) येथील शेतकरी माधव तुकाराम चव्हाण यांच्या वांग्याला प्रति कॅरेट 1352 रुपयांचा भाव मिळाला आहे. एक कॅरेटमध्ये साधारण 13 ते 15 किलो वांगी बसतात, त्यामुळे चव्हाण यांच्या वांग्याला जवळपास 100 रुपये किलोचा दर मिळाला आहे. 18 ऑक्टोबर रोजी त्यांची वांगी सर्वाधिक भावाने विकली गेली आहेत. चव्हाण यांनी आजवर 3 महिन्यामध्ये साडेचार टन वांगी विकली आहेत. किमान 40 रुपये ते 100 रुपये किलो दर मिळाला, असून पावणे दोन एकर वांग्याचा प्लॉट आहे. लागवड, खते, फवारणी, तोडणी, वाहतूक खर्च वजा जाता निव्वळ उत्पन्न 2,50,000 झाले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. विशेष म्हणजे अजूनही त्यांची वांगी तोडणी चालूच आहे.

या संदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले की, आपल्या तरुण शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिल्यास उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी हे दिवस परत झाल्याशिवाय राहणार नाहीत. शेतकऱ्यांचा कमी खर्चा मध्ये जास्त उत्पादन घेण्याकडे कल असावा अशी भावना शेतकरी माधव चव्हाण यांनी बोलून दाखवली.

One thought on “वांग्याला विक्रमी भाव : 1352 रुपये कॅरेट

Leave a Reply

error: Content is protected !!