माजी संचालक ऍड दीपक पवार यांनी केली तक्रार
पंढरपूर : ईगल आय मीडिया
भाळवणी ( ता.पंढरपूर ) येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सभासद वाढ आणि मागील सभासदांना वगळण्यासंदर्भात सुरू असलेल्या कारवाईला पायबंद घालावा, अधिकृत सभासदांची यादी मिळावी अशा मागण्यांचे निवेदन कारखान्याचे माजी संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ऍड. दीपक पवार यांनी सहकार मंत्र्यांकडे केली आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन ऍड. पवार यांनी हे निवेदन दिले आहे.
या निवेदनात ऍड.पवार यांनी 3 मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये, मागील निवडणुकीमध्ये चेअरमन कल्याणराव काळे यांनी जवळपास एक हजार सभासदांना ऐनवेळी बेकायदेशीरपणे कमी केले होते व त्यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला होता. निवडणुकीत सभांमध्ये बोलताना ती नावे चुकून कमी झाली असून निवडणुकीनंतर त्या लोकांना सभासद करून घेतले जाईल, असा शब्द देखील दिलेला होता परंतु परत त्या लोकांना सभासद केले गेले नाही.
आगामी निवडणूक जवळ आलेली असून संचालक मंडळ मागील निवडणुकीमध्ये विरोधात मतदान केलेल्या अडीच – तीन हजार सभासदांपैकी आणखी एक हजार सभासद कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत, अशा पद्धतीची माहिती मिळाली आहे. या सभासदांचा हक्क हिरावून घेतला जाऊ नये अशी मागणी केली आहे.
आज असणार्या एकूण सभासदांची यादी आम्हाला मिळावी, तसेच
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन १९/२० चा ऑडिट रिपोर्ट नुसार जवळपास १२०० सभासद वाढवले गेल्याचे व ते सभासद कार्यक्षेत्रा बाहेरील असल्याचे चुकीच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून केवळ निवडणुकीसाठी त्यांना सभासदत्व दिले गेलेले आहे, अशी माहिती आहे तरी त्या वाढीव सभासदांची स्वतंत्र यादी आम्हास मिळावी.
कारखान्याच्या स्थापने पासून हजारो लोकांचे पैसे शेअर्स देतो म्हणून कारखान्याने घेतलेले आहेत. परंतु त्या रकमा शेअर्स अनामत खात्यात जमा करून त्या लोकांना आजतागायत सभासद करून घेतलेले नाही. तर अशा शेअर्स अनामत रकमा जमा असणार्या व्यक्तींची स्वतंत्र यादी आम्हाला उपलब्ध करून द्यावी व त्या व्यक्तींना कायद्यानुसार सभासद करून घ्यावे. या तिन्ही विषयामध्ये त्वरित लक्ष घालून योग्य ती उपाययोजना व कारवाई करावी अशीही मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.