पांडुरंग ची निवडणूक आधी ? मग विठ्ठल ची कधी

एप्रिलमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीची शक्यता

पंढरपूर : ईगल आय मीडिया

तालुक्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या विठ्ठल आणि पांडुरंग आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. मात्र अगोदर पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर विठ्ठल आणि सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या निवडणूका अंतिम टप्प्यात होण्याची शक्यता आहे.

राज्यातील मागील वर्षी 31 डिसेंम्बर अखेर मुदत संपलेल्या अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग आणि ड वर्गातील हजारो सहकारी संस्थांच्या निवडणुका। कोरोना मुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या, आता त्या घ्याव्या लागणार आहेत, यासाठी राज्य सरकारने एक आराखडा तयार केला आहे. त्या आराखड्यानुसार विविध काळात मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका 6 टप्प्यात घेण्यात येणार आहेत. या आराखडयानुसार पांडुरंग सहकारी साखर कारखाना तिसऱ्या टप्यात तर विठ्ठल सहकारी साखर कारखाना 6 व्या टप्प्यात येतो आहे.

नुकताच राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश काढला असल्याने पुढील महिन्यात आराखड्यानुसार निवडणुक कार्यक्रम जाहीर होणार की कसे याबाबत अजूनही स्पष्टता नाही. आराखड्यानुसार निवडणूक कार्यक्रम घेतला तर पांडुरंग सहकारी साखर कारखाना तिसऱ्या टप्प्यात असल्याने मे – जून मध्ये निवडणूक लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर विठ्ठल सहकारी साखर कारखाना 6 व्या टप्प्यात असल्याने या साखर कारखान्याची निवडणूक सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

त्यामुळे सध्या तरी पांडुरंग आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे बिगुल वाजण्याची शक्यता कमी असून जून नंतर या मोठ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याची अपेक्षा आहे. तत्पूर्वी एप्रिलमध्ये पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मे – जून नंतरच पांडुरंग, सहकार शिरोमणी आणि विठ्ठल च्या निवडणुका होणार असल्याचे सहकार विभागातून बोलले जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!