कृत्रीमरित्या द्राक्षांचे भाव पाडले जाण्याची शक्यता !
पंढरपूर : ईगल आय मीडिया
गेल्या वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी आता पुन्हा ‘लॉक डाऊन’ च्या चर्चेने धास्तावला आहे. लॉकडाऊनच्या नावाखाली व्यापारी वर्ग कृत्रिमरित्या द्राक्षांसह फळ पिकांचे भाव कमी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा आर्थिक फटका बसतो आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.
सध्य परिस्थितीत रोजच कानावर पडत असलेल्या अंशतः लॉकडाऊन, मायक्रो कंटेटमेंट झोन, विकएंड लॉकडाऊन, सोसायट्या लॉकडाऊन या शब्दाने शेतकर्यांच्या अंगावर काटे उभा केले आहेत. लॉकडाऊन शब्दाच्या उच्चारानेच शेतीमाल घेणारे व्यापारी, एजंट प्रतिकिलोला 25 ते 30 रुपये दर कमी देत आहेत.
त्यामुळे व्यापारी शेतमालाची किंमत कवडीमोल करण्याची भिती प्रगतशिल शेतकरी डाळिंबरत्न दत्तात्रय साहेबराव भोसले, युवराज साळुंखे, अविनाश पाटिल, सत्यवान साळुंखे या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
शेेेतात वर्षभर अतिशय महाग असणारी सेंद्रिय-रासायनिक खते, बुरशीनाशके, किटक नाशके, संजीवके वापरुन उच्च दर्जाचा माल कष्टाने तयार केला. पण या लॉकडाऊनच्या नुसत्या अफवेनेच शेतकर्यांचा गळा घोटविला जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चंद्रशेखर कोळवले, विजय पाटिल, रावसाहेब गाढवे, समाधान घालमे, सुभाष भोसले, संभाजी कुरे, गणेश पाटील या शेतकर्यांनी भिती व्यक्त केली.
कृषीप्रधान भारतातील शेतकर्यांच्या शेतमालाचा भाव कृत्रीमरित्या जर पाडला जात असेल तर सरकारने त्यास चाप लावलाच पाहिजे. पिकवलेला शेतमाल सरकारची जबाबदारी म्हणून उत्पादक खर्चावर आधारीत नफा देऊन सरकारने खरेदी करावा, किंवा प्रशासकीय यंत्रणा कामाला लावण्याची अत्यंत गरज आता निर्माण झाल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.