दोन आमदार सहभागी असलेले संचालक मंडळ बरखास्त
सोलापूर : ईगल आय मीडिया
सोलापूर जिल्हा दूध उत्पादन व प्रक्रिया सहकारी संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून संघाचा कारभार प्रशासकाच्या हाती सोपवण्यात आला आहे. त्यामुळे दोन विद्यमान आमदार संचालक आणि माजी आमदार चेअरमन असूनही दूध संघावर प्रशासक नेमण्याची नामुष्की ओढवली आहे. यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणाचं केंद्र म्हणून सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाकडे पाहिलं जातं होतं. जिल्ह्यातल्या बहुतांश राजकीय नेत्यांच्या राजकीय जीवनाचा श्रीगणेशा संघाच्या संचालक मंडळापासून झाला. त्याच्याही पुढे याच संघाच्या संचालक मंडळ सदस्यत्वाच्या साहाय्याने जिल्ह्यातल्या बड्या नेत्यांनी आमदारकी, मंत्रिपदापर्यंत मजल मारली. त्यावेळी मासबेस राजकारण म्हणून दूध संघाचा वापर झाला, मात्र कालांतराने सहकाराची चळवळ स्वाहाकाराची ठरली अन् सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाला उतरती कळा लागली.
घटलेलं दूध संकलन, बिघडलेली आर्थिक शिस्त आणि अनियमितता या कारणांमुळे आज सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. माजी आमदार आणि शिवसेना नेते दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या संचालक मंडळाचा कारभार सुरु होता. विद्यमान आमदार संजय शिंदे, विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक हे दिग्गज नेते संचालक मंडळावर असतानाही ही कारवाई करण्यात आली आहे.
त्याच अनियमिततेचा परिणाम म्हणून नावलौकिक मिळवलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक मंडळ आज बरखास्त करण्यात आले आहे. आता यापुढे सोलापूरच्या दूध संघाचा कारभार प्रशासक मंडळ पाहणार असून या मंडळाचे अध्यक्ष म्हणून पुणे विभागीय दूग्ध उपनिबंधक सुनील शिरापूरकर हे असणार आहेत, तर सदस्य म्हणून सहाय्यक निबंधक आबासाहेब गावडे, सहकार अधिकारी सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज आपला पदभार घेतला.