स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
पंढरपूर : ईगल आय मीडिया
गायीच्या दुधाला तीस रुपये दर द्या अथवा दहा रुपये अनुदान द्या अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना याबाबतचे निवेदन संघटनेच्यावतीने देण्यात आले.
कोरोना महामारीचा दुग्धव्यवसाय परिणाम झाला आहे. दुधाचे दर हे तीस रुपयांवरून अठरा ते वीस रुपयांवर आले आहेत. याचा फटका दुग्ध उत्पादकांना बसत आहे. एका बाजूला अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला मालाला अपेक्षित दर न मिळाल्याने त्याला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला आहे. अशा मध्ये त्याच्यासाठी दुग्ध व्यवसाय हा मोठा आधार आहे. त्यामध्येही आता दरातील घसरणीमुळे अडचणी निर्माण होत आहेत. एका बाजूला पशुखाद्याच्या किमती वाढलेल्या असताना तसेच चारा उपलब्धतेसाठी कसरत करावी लागत असताना, दुधाच्या दरात मात्र दहा ते बारा रुपयांनी घट झाली आहे. खाजगी संस्था चालक हे मनमानी पद्धतीने दर कमी करीत आहे, शासनाने यामध्ये हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना तीस रुपये दर मिळावा यासाठी प्रयत्न करावे किंवा दहा रुपये अनुदान द्यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे.
यावेळी जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष विजय रणदिवे, जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, तालुकाध्यक्ष सचिन पाटील आदी उपस्थित होते.