माजी खा. धनंजय महाडिक यांचा आरोप
टीम : ईगल आय मीडिया
कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि खासदार संजय मंडलिक हे आपल्या मंत्रिपदाचा आणि खासदारकीचा गैरवापर करून थकीत एफआरपी व कर्मचाऱ्यांची देणी यावरून भीमा सहकारी साखर कारखान्यावर कारवाई व्हावी म्हणून तक्रार करत आहेत, असा आरोप भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर केला आहे.
कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत धनंजय महाडिक बोलत होते. यावेळी पुढे बोलताना महाडिक म्हणाले, ‘सध्या साखर उद्योग अडचणीत आहे. साखर उद्योग संकटातून बाहेर पडावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकारमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करत आहेत.
मात्र कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील व खासदार संजय मंडलिक हे थकीत एफआरपी वरून सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यावर कारवाई व्हावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सहकार विभागाकडे तक्रार करत आहेत. मंत्री पाटील आणि खासदार मंडलिक हे त्यांच्या लेटरहेडवरून अशा तक्रारी करत असतील तर ते चुकीचे आहे.
खासदार, आमदार आणि मंत्रिपद हे लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, शहर विकासासाठी नवनवे प्रकल्प आणण्यासाठी असते. मात्र हे दोघे जण मंत्रिपद आणि खासदारकीचा वापर भीमा कारखान्यावर कारवाईसाठी करत आहेत. राजकीय विरोधकांचे उद्योग व्यवसाय उद्ध्वस्त झाले पाहिजेत, अशा विकृत मानसिकतेतून ते काम करत आहेत, असाही आरोप महाडिक यांनी केला.
धनंजय महाडिक पुढे म्हणाले, ‘ मात्र त्यांच्याशी निगडीत डीवायपी मॉल, हॉटेल सयाजी या मालमत्तेचा कोट्यवधी रुपयांचा घरफाळा बुडविला गेला आहे. पन्नास ते साठ हजार फुटांचे अतिरिक्त बांधकाम केले आहे. याविषयी ते चकार शब्दही बोलत नाहीत. कॉलेजचा ६४ लाखांचा घरफाळा थकविला म्हणून महापालिकेने नोटीस काढली. त्यानंतर ३५ लाख भरले. ड्रीमवर्ल्डचा घरफाळा थकीत आहे. आता हा प्रोजेक्ट ते महापालिकेकडे हस्तांतरित करत आहेत. मंत्रिपदाचा वापर स्वत:च्या सोयीसाठी होत आहे, मात्र सत्ताचक्र बदलत असते, उद्या आमची सत्ता येईल तेव्हा बघू, असाही ईशारा महाडिक यांनी दिला.