१३ जागा : १३ अर्ज
पंढरपूर : eagle eye news
येथील निशिगंधा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची सन २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीकरिताची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पंढरपूर पी. सी. दुरगुडे यांनी जाहिर केले.
सन १९९७ साली प्रभाकर लाड (गुरूजी) यांनी स्थापन केलेल्या निशिगंधा सहकारी बँकेच्या कामकाजात सन २०१० पासून सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांचे नेतृत्वाखाली संचालक मंडळाने बँकेच्या कामकाजात भरीव प्रगती केलेली आहे. बँकेला अर्थिक स्थितीतून सावरण्यात विद्यमान संचालक मंडळाला यश आले असून पंढरपूर येथील मुख्य शाखा व भाळवणी शाखेसह बँक प्रगती पथाकडे घौडदौड करीत आहे.
मागील दहा बारा वर्षामध्ये बँकेच्या सभासदांनी टाकलेल्या विश्वासास पात्र राहून संचालक मंडळाने चांगले कामकाज केले आहे. भविष्यात स्वतःची इमारत व शाखाविस्तारा बरोबरच ग्राहकांना इतर सोयी सुविधा पुरविण्यासाठी व बँकेच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहू
कल्याणराव काळे
बँकेकडे रू. ३६.४७ कोटी ठेवी असून रू. १९.७२ कोटींचे कर्ज वितरीत केले आहे, तसेच रू. १६.०५ कोटींची गुंतवणूक आहे. सहकार विभाग व राज्य सहकारी बँक्स फेडरेशन तसेच बॅको, कोल्हापूर यांचेकडून उत्कृष्ट सेवेबद्दल बँकेस गौरविण्यात आलेले आहे. बँकेतर्फे मा. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजने अंतर्गत जवळपास १२५ पेक्षा जास्त नवउद्योजकांना सुमारे १० ते १२ कोटी रूपयांचे कर्ज वितरीत करण्यात आलेले असून त्या माध्यमातून लाभार्थ्यांना रू. १ कोटी व्याज परतावा मिळालेला आहे. शहराच्या व्यापारी वर्गाबरोबरच ग्रामीण भागातूनही बँकेच्या ग्राहकांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.
संचालक मंडळ
संचालक मंडळाच्या १३ जागेसाठी सर्वसाधारण मतदार संघातून कल्याणराव वसंतराव काळे, राजेंद्र बबनराव जाधव, भानुदास बलभिम सावंत, डॉ. राजेंद्र मुरलीधर जाधव, सतिश प्रभाकर लाड, डॉ. मंदार सुभाष सोनवणे, महेश प्रकाश पटवर्धन व वैभव विलासराव साळुंखे, महिला मतदार संघातून ॲड. क्रांती रविकिरण कदम व शोभा दत्तात्रय येडगे, ई.मा. वर्गातून अनिल नारायण निकते, भ.वि.जा.ज. वर्गातून भागवत वासुदेव चवरे, तर अनु.जा. ज. वर्गातून देविदास विठ्ठल सावंत यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.