विहिरी वाहू लागल्या : शेतांची झाली तळी

पंढरपूर तालुक्यात यंदा शेतकऱ्यांना ‘ कोरोनानं घेरलं अन पावसानं मारलं ‘

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गेल्या काही वर्षांपासून पावसाअभावी सातत्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या पंढरपूर तालुक्यात यंदा पावसाने अभूतपूर्व अशी हजेरी लावली आहे. त्यामुळे तालुक्यातील विहिरी वाहू लागल्या आहेत आणि शेतांची तळी झालेली आहेत. शेकडो हेक्टर पिके आणिक आठवडे पाण्यात उभा राहून सडून जाऊ लागली आहेत. त्यामुळे ” नेहमी दुष्काळ भाजून काढतो, यंदा पाऊस बुडवून मारणार ,” अशी परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे.

पंढरपूर तालुका तसा भीमा नदी, उजनी कालवा, तिसंगी तलाव, नीरा – उजवा कालवा यामुळे बागायती असला तरी गेल्या 10 पैकी 4 वर्षे तर तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका सहन करावा लागला, तसेच या दुष्काळाचा फटका तालुक्यातील साखर कारखानदारीला ही बसला आहे.

या पार्श्वभूमीवर यंदा मात्र पावसाने जून पासूनच तालुक्यातील सर्व भागात दमदार हजेरी लावली. प्रत्येक महिन्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडला आहे. सप्टेंबर महिन्यात तर अनेक मंडलात विक्रमी पाऊस झाला. कधी पूर पाहिला नाही अशा दुष्काळी कासाळ ओढ्याला यंदा पूर आला, ओढ्यालगतची घरे पाण्यात गेली, जनावरे वाहून मेली, पिके, बंधारे वाहून गेले. एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

सातत्याने पाऊस पडत गेल्याने जमिनीतील पाणी पातळी उंचावून ती आला जमिनीवर आली आहे. एरवी कोरड्या ठणठणीत असणाऱ्या विहिरी चक्क वाहू लागल्या आहेत. विहिरीच्या काठावर बसून ओंजळीने पाणी घ्यावं आणि प्यावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतांमधून पाणी साठुन राहिले आहे, त्यामुळे शेतांची पाणथळ झाली आहेत.

डाळिंब, द्राक्षे, शेवगा अशा फळबागा पाण्याने कुजून गेल्या आहेत तर ऊस, केळी सारख्या पाण्याच्या पिकांची ही वाढ अतिपाण्यामुळे खुंटली आहे. अनेक एकर कांदा लागवड पाण्याने वाहून गेली. शेतात शेवाळ आणि जलपर्णी वनस्पती वाढू लागल्या आहेत. पुढचे किमान 1 महिना तरी शेतात कोणतेच काम करता येणार नाही, अशा प्रकारे शेतामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे. त्यामुळे तालुक्यात यावर्षी ‘ एका बाजूला कोरोनाने घेरलं आणि दुसऱ्या बाजूला पावसानेच मारलं’ अशी अवस्था बळीराजाची झाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!